मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोहोळ मतदारसंघातच दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात आज जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवारांचा दौरा लक्षवेधी ठरला. या दौऱ्यात अजित पवारांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते आणि मोहोळचे सुपुत्र उमेश पाटील (Umesh patil) यांना चांगलंच झापलं. अजित पवारांचा यापूर्वीचा दौरा माझ्यामुळे रद्द झाला, असं कोणीतरी म्हटलं, हा संदर्भ देत अजित पवारांनी चक्क कुत्र्‍याची उपमा देत नाव न घेता उमेश पाटलांना सुनावलं होतं. आता, उमेश पाटील यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्यावर भाष्य केलंय. तसेच, मी ते वक्तव्य केलंच नव्हतं, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. 


प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार आहे. माझं फक्त त्यांना एकच सांगणं आहे की, जी कारवाई होईल ती सिलेक्टिव्ह कारवाई नको. कारण, राजन पाटील यांनी कोणत्याही प्रकारची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली नसताना देखील परस्पर मोहोळ विधानसभेचा उमेदवार घोषित कसा काय केला? यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हायला नको का?, असा सवाल उमेश पाटील यांनी विचारला. तसेच, आमदार यशवंत माने हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना सोबत घेऊन फिरतात आणि अजित पवारांना दिलेल्या निधीच्या कार्यक्रमांची उद्घाटन त्यांच्यासमवेत करतात हे पक्षशिस्त मोडणारे नाही का?, असे दोन प्रश्न उपस्थित करत या दोन्ही नेत्यांवर कारवाईची मागणी उमेश पाटील यांनी केली आहे.  


तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर


मी कुठल्याही प्रकारे अजित पवार यांनी माझ्यामुळे दौरा रद्द केला असं कुठेही बोललेलो नाही. मी जर तसे बोललो असं मला दाखवून दिलंत, तर मी सार्वजनिक जीवनातून, राजकारणातून निवृत्ती घेईन, असे चॅलेंजच उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना व मोहोळच्या स्थानिक नेतेमंडळींना दिलं आहे. तसेच, आमदार यशवंत माने आणि राजन पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने अजित पवार यांचे जाऊन कान भरले. अजित पवार यांचा स्वभाव मला ह्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे, जर मी कुठेही अजित पवारांबाबत बोललो असेल तर सार्वजनिक जीवनातून लगेचच निवृत्ती जाहीर करेल, अशी घोषणाही उमेश पाटील यांनी केली. 


सत्ता नसतानाही मी अजित दादांसोबतच 


अजित पवार कालही माझे नेते होते, आजही माझे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर मला काहीही बोलायचं नाही. मात्र, सत्ता नसती तर यशवंत माने, राजन पाटील हे तुमच्यासोबत आले असते का, सत्ता नसताना उमेश पाटील तुमच्यासोबत आला असता का, ह्या प्रश्नाचे उत्तर एकच आहे. सत्ता नसती तरीसुद्धा उमेश पाटील तुमच्यासोबतच आला असता, पण राजन पाटील व यशवंत माने तुमच्यासोबत आले नसते, हे अजित पवारांनाही माहिती आहे, असेही उमेश पाटील यांनी म्हटले. 


काय म्हणाले होते अजित पवार


कोण कोण काय काय सांगतय, त्याचा उल्लेख मगाशी तटकरेसाहेबांनी केला. मधीतरी कोणतरी पट्ट्या म्हटला, दादांचा दौरा मी रद्द केला. अजित पवारने आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचाय, असे म्हणत उमेश पाटील यांच्यावर निशाणा साधला. तसेच, पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे मी माझा दौरा पुढे ढकलल्याची माहिती दिली. तसेच, बैलगाडी खाली एक कुत्र चाललेलं असतंय, त्याला वाटतं मी गाडी आढतोय. पण, अरे तुझ्या पुढं बैलं आहेत, ती ही गाडी आढतायंत, तू देवळातली घंटा हलवतो का?, अशा शब्दात अजित पवारांनी नाव न घेता उमेश पाटलांना झाप झाप झापलं.


हेही वाचा


Video: तू देवळातली घंटा हलवतो का?, अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं; तटकरेंनीही कान टोचले