सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवार (Ajit pawar) यांची जनसन्मान यात्रा आज सोलापूर जिल्ह्यात पोहोचली असून मोहोळ येथे त्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी, अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यात महायुतीचे आमदार विजयी करण्याचं आवाहन सोलापूरकरांना केलं असून मोहोळमध्येही राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या घड्याळाला साथ देण्याची विनंती त्यांनी येथील जनतेला केला. मोहोळच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील हे एकमेकांचे विरोधक मानले जातात. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही नेते अजित पवारांच्यासोबत आहेत. एकच पक्षात असले तरी स्थानिक पातळीवर उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यातील वितुष्ट कायम आहे. त्यातच, मोहोळमधील (Mohol) बंदला पाठिंबा देताना, दादा आपसे बैर नही, राजन तेरी खैर नही, असा नारा उमेश पाटलांनी दिला होता. मात्र, अजित पवारांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेल्या उमेश पाटलांना चांगलंच झापलं आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही उमेश पाटलांचे कान टोचले होते.
मोहोळमध्ये आज अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला असून आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला. मात्र मोहोळ अपर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून मोहोळ बचाव संघर्ष समितीकडून मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे, या बंदचा धागा पकडत अजित पवारांनी नाव न घेता उमेश पाटील यांना चांगलच झापलं.
कोण कोण काय काय सांगतय, त्याचा उल्लेख मगाशी तटकरेसाहेबांनी केला. मधीतरी कोणतरी पट्ट्या म्हटला, दादांचा दौरा मी रद्द केला. अजित पवारने आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचाय, असे म्हणत उमेश पाटील यांच्यावर निशाणा साधला. तसेच, पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे मी माझा दौरा पुढे ढकलल्याची माहिती दिली. तसेच, बैलगाडी खाली एक कुत्र चाललेलं असतंय, त्याला वाटतं मी गाडी आढतोय. पण, अरे तुझ्या पुढं बैलं आहेत, ती ही गाडी आढतायंत, तू देवळातली घंटा हलवतो का?, अशा शब्दात अजित पवारांनी नाव न घेता उमेश पाटलांना झाप झाप झापलं.
काय आहे वाद?
राजन पाटील यांनी आमदार यशवंत माने यांच्या मदतीने आपल्या अनगर गावात अपर तहसील कार्यालय मंजूर करून घेतले. हे कार्यालय मंजूर होताच मोहोळ येथील राजन पाटील विरोधी गटातील सर्वच राजकीय नेत्यांनी एकत्रित येऊन या अपर तहसील कार्यालयाला विरोध केला. यामध्ये महायुतीमध्ये सहभागी असलेल्या भाजप, शिंदे गटासह अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचा ही सहभाग होता. मात्र हा विरोध जुगारून अपर तहसील कार्यालय सुरु झाले. हाच विरोध अजित पवारांसमोर दर्शवण्यासाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून मोहोळ बंदची हाक देण्यात आलेली होती.
बंद पुकारुन विरोध दर्शवण्याचा प्रयत्न
मोहोळमधील बंद हा राजकीय भूमिकेतून नसून लोकांच्या मागणीसाठी असल्याचे मत उमेश पाटील यांनी मांडलं आहे. काही दिवसापूर्वी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर गावात नव्याने अपर तहसील कार्यालय सुरु झालं आहे. मोहोळ येथील विविध पक्षातील राजकीय नेत्यांचा अनगर येथे हे कार्यालय होण्यास विरोध असून या आधी अनेक आंदोलन झाले होते. मात्र, आंदोलननंतर ही अनगर येथे हे अपर तहसील कार्यालय सुरु झाले आहे, उद्या अजित पवारांच्या दौऱ्याच्या निमित्ताने बंद पुकारून हा विरोध दाखवून देण्याचा प्रयत्न मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीकडून करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी उमेश पाटील यांना शेलक्या शब्दात झापल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा
जालना, पुणेनंतर आता अहमदनगर बंदची हाक; मनोज जरागेंच्या समर्थनार्थ सकल मराठा रस्त्यावर