मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांआधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ठाकरे गटाच्या (UBT) प्रचारगीत सार्वजनिक करण्यात आले होते. धगधगती पेटू दे मशाल.. असं हे टायटल साँग असून कार्यकर्त्यांनी घराघरात हे गीत आणि शिवसेनेचं नवं चिन्ह पोहोचविण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. मात्र याच प्रचारगीतावरुन निवडणूक आयोगाने (Election Commission) उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली आहे.
ठाकरे गटाच्या मशाल गीतामध्ये 'जय भवानी' शब्द असल्याने निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. यावरुन उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडलं. आम्ही जय भवानी म्हटलं तर धार्मिक प्रचार होतो, मग मोदी, शहा जय बजरंगबली म्हणतात, ते कसं चालतं?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
60 सेकंदाचं प्रचारगीत-
शंखनाद होऊ दे, रणदुदंभी वाजू दे
नादघोष गर्जू दे विशाल
दृष्टशक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या
धगधगती पेटू दे मशाल...
हे गीत एकूण 60 सेकंदाचं आहे. यामध्ये शेवटच्या काही सेकंदमधील फक्त 1 सेकंद जय भवानी असा उल्लेख गीतामध्ये करण्यात आला आहे. हाच 1 सेकंदावरुन निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना घेरलं आणि थेट नोटीस बजावली.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ऐकवली ऑडिओ क्लिप-
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभेतील भाषण ऐकवले. यामध्ये नरेंद्र मोदी बजरंग बली की जय, असं बोलून बटण दाबा,अशी बोलतानाची ऑडिओ क्लिप ऐकवली. अमित शहा यांची आमचं सरकार आणल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, बोलतानाची ऑडिओ क्लिप ऐकवली. यानंतर आधी मोदी-शहांवर कारवाई करा, असं आव्हान देखील उद्धव ठाकरेंनी दिलं. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना हवं ते बोलता येतं मग आम्हाला का नाही ? मोदी, शहांना वेगळे नियम लागू होतात का?, असं म्हणत आम्ही जय भवानी म्हणणारच, असं ठाम मत उद्धव ठाकरेंनी मांडलं.
धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत-
राज्यातील शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) या पक्षाचा उदय झाला. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत दिसून येते. त्यामुळे, दोन्ही पक्षांनी आपआपल्या चिन्हांचा प्रचार सुरू केला आहे. उद्धव ठाकरेंकडून धनुष्यबाण चिन्ह गेल्यामुळे ठाकरे कुटुंबीय व कार्यकर्तेही भावूक झाल्याचं दिसून आलं. मात्र, नव्या जोमाने मशाल घेऊन उद्धव ठाकरे व शिवसेना कार्यकर्ते निवडणुकीत कामाला लागले आहेत.
संबंधित बातमी:
हा तर तुळजाभवानीचा अपमान, उद्या 'जय शिवाजी' शब्द काढायला लावाल; ठाकरेंचा निवडणूक आयोगावर प्रहार