मुंबई: आम्ही पंतप्रधानपदावर कधी चर्चा करत नाही आणि करण्याची गरज देखील नाही. कारण आमच्याकडे या पदासाठी खूप चेहरे आहेत. त्यातला एखादा चेहरा पंतप्रधान होईल, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) इंडिया आघाडीचा प्रचार करत आहेत. त्यांना सत्तेचा लोभ नाही. राहुल गांधींनी देशात नेतृत्व करावं, अशी आमची इच्छा असल्याचं देखील संजय राऊतांनी सांगितलं. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.
प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो-
प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही.प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही. हा मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीससुद्धा (Devendra Fadnavis) वेगळे नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जे सांगितले आहे ते शंभर टक्के सत्य असल्याचं संजय राऊत म्हणाले.
मोदी-शहा यांना ते आवडलं नाही-
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरती बसून मी दिल्लीत जाईन. दिल्लीत अर्थमंत्री होईल, दिल्लीत गृहमंत्री होईल आणि मी पंतप्रधान होईल असं देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही.महाराष्ट्राच्या नेत्याला असं नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठीशी उभे राहतो. पण फडणवीसांचं हे स्वप्न बहुदा मोदी आणि शहा यांना आवडलं नाही आणि स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री केलं, असं मला एकंदरीत जे काही राजकारण आम्हाला कळतं त्यानुसार दिसतं, असं संजय राऊतांनी सांगितले. मोठं स्वप्न जेव्हा फडणवीस पाहायला लागले, तेव्हा मोदी आणि शाह यांनी काहीतरी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनिअर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावलं. यालाच मोदी आणि शाह यांची राजनीती म्हणतात, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाल की, उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत. त्यांना वेड लागलंय, मला नाही. कालपर्यंत ते वेगळ्याच भ्रमात होते. कालपर्यंत म्हणत होते की अमित शाहांनी त्यांना कुठल्यातरी खोलीत नेऊन मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. आता त्यांचा भ्रम बदलला. आता म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी आदित्यला मुख्यमंत्री करतो असा शब्द दिला. उद्धव ठाकरेंनी नेमकं ठरवावं त्यांना नेमकं कोण शब्द दिला होता.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार होते असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अमित शाह भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून भाजपचा सूर बदलला असंही उद्धव म्हणाले. तुम्ही देश पाहा, आम्ही महाराष्ट्र पाहतो असं बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हापासून भाजप आणि आमच्यात चांगलं सुरू होतं. 2012 मध्ये माझ्या वडिलांचं निधन झाल्यावर मोदी घरी आले होते. 2014 मध्ये मोदी पीएम झाले तेव्हा वाटलं, आपलं स्वप्न पूर्ण झालं. पण अमित शाह अध्यक्ष बनल्यावर भाजपचा सूर बदलला. भाजपच्या बोलण्यात मग्रुरी दिसत होती. बाळासाहेब गेले, वार करण्याची हीच वेळ आहे असं भाजपला वाटलं. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं धोरण आहे. माझ्यासोबत त्यांनी हेच करण्याचा प्रयत्न केला