Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. भारतात गेल्या 24 तासात दोन हजार 208 नवीन रुग्ण आढळले असून 12 मृत्यूची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या आता नवीन 1112 रुग्णांसह 4 कोटी 46 लाख 46 हजार 880 वर पोहोचला आहे. यातील 4 कोटी 40 लाख 68 हजार 557 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. सध्या देशात 20 हजार 821 रुग्ण कोरोना उपचाराधीन आहेत. आहे. गेल्या 24 तासांत 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनामृतांचा आकडा 5 लाख 28 हजार 987 वर पोहोचला आहे.


देशात 219 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या


देशात गेल्या 24 तासांत 2208 रुग्णांची नोंद आणि 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 1112 नवीन कोरोनाबाधित आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. देशव्यापी लसीकरणात भारतात आतापर्यंत 219 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशात 94.94 कोटी जणांना लसीचा दुसरा डोस तर 21.76 कोटी जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. देशात लसीकरण आणि कोविड चाचण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 2 लाख 37 हजार 952 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत भारतात 89.81 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.


कोरोनाविरुद्ध लढण्यात जगाला भारताची मदत


भारत हा जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक आहे, असं म्हणत अमेरिकेने भारताचं कौतुक केलं आहे. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, जागतिक स्तरावर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा (Coronavirus Vaccine) साठा पुरवठा करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. व्हाईट हाऊसचे कोरोना विषाणू रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर डॉ. आशिष झा यांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलताना पत्रकारांना ही प्रतिक्रिया दिली आहे.


जगभरात नव्या व्हेरियंटचा धोका


कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. जगभरात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे तीन नवीन सबव्हेरियंट आढळून आले आहेत. BF.7, XBB आणि BA.5.1.7 हे नवीन व्हेरियंट आढळले आहेत. कोरोनाचे नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षाही अधिक संसर्गजन्य आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नवीन व्हेरियंटविरुद्ध लढण्यासाठी प्रशासनाची तयारी सुरु आहे. येत्या काळात कोरोनाच्या लाटेचा धोकाही शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.