ठाणे: आम्ही आजपर्यंत कायम राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले. निवडणुकीची अग्नीपरीक्षा आमच्यासाठी नवीन नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे अगोदरच निवडून आले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पत्नी लता शिंदे (Lata Shinde) यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ठाण्यात लोकसभा निवडणुकीचे (LokSabha Election Voting) मतदान केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी ठाण्यातील मतदारांना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना मतदान करण्याचे आवाहन केले.


महिलांनी आज घरातील कामं बाजूला ठेवावीत. सगळ्यांनी मतदानासाठी खाली उतरा, दुसऱ्यांनाही खाली उतरवा आणि नरेश म्हस्के यांना मतदान करा, असे लता शिंदे यांनी म्हटले. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार, असा प्रश्न लता शिंदे यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, डॉ. श्रीकांत शिंदे खासदार आहेत. तो अगोदरच निवडून आलाय. त्याच्याबद्दल काय सांगणार? जनता त्याच्यासोबत आहे. श्रीकांत शिंदे भरघोस मतांनी निवडून येत कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक करतील, असा विश्वास लता शिंदे यांनी व्यक्त केला.


आमच्या नसानसांमध्ये समाजकारण भरलंय: लता शिंदे


राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे उमेदवार उभे आहेत. ही एकनाथ शिंदे यांची अग्नीपरीक्षा आहे का, असा प्रश्न लता शिंदे यांना विचारण्यात आला. यावर लता शिंदे यांनी म्हटले की, लोकसभा निवडणूक अग्नीपरीक्षा वैगरे वाटत नाही. आमच्या नसानसात समाजकारण भरलं आहे. त्यामुळे निवडणुका शिंदे साहेबांसाठी नवीन नाहीत. आम्ही पहिल्यापासून राजकारण करण्यापेक्षा समाजकारण केलं आहे, असे लता शिंदे यांनी सांगितले. 


तुम्हाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार का? श्रीकांत शिंदे म्हणाले...


श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात आपला 100 टक्के विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी केवळ आरोप करण्याचे काम केले. महाराष्ट्रात आजपर्यंत इतका शिवीगाळ झालेला कोणी पाहिला नव्हता. विरोधक पराभवाच्या भीतीने सैरभैर झाले आहेत. पण आम्ही संयम ठेवून काम केले. आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विकासासाठी काम केले आहे. त्यामुळे आम्हाला रिझल्ट मिळेल. मला लोक मतदान करतील, याचा आत्मविश्वास आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.


यावेळी त्यांना आगामी केंद्रीय मंत्रिमंडळात तुम्हाला स्थान मिळणार का, असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, मी मंत्रि‍पदाची स्वप्न बघत नाही. मला लोकांनी दिलेली जबाबदारी 100 टक्के निभावण्याचा प्रयत्न मी करतो. केंद्रीय मंत्रि‍पदासारखी मोठी स्वप्न बघायची माझी सवय नाही, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. 


आणखी वाचा


महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदारांनी बजावला हक्क, पालघरमध्ये सर्वाधिक 7.95 टक्के मतदान