पुणे : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून उपोषण सुरु केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. दुसरीकडे मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट पुणे न्यायालयानं काढलं आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची (Pune Drama Producer) फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे- पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यानं मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. 


नेमकं प्रकरण काय?


मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगांचं आयोजन केलं होतं. त्यासंदर्भात नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याप्रकरणी संबंधित नाट्यनिर्मात्यानं कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.  मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयानं नाट्य निर्मात्याची फसवणुकीचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने अटकेचे वॉरंट काढले आहे.


नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक  केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर मनोज जरांगे एकदा न्यायालयासमोर हजर राहिले होते. त्यावेळी 500 रुपयांचा दंड करुन मनोज जरांगे यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आलं होतं. 


2013 मध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाट्य प्रयोगाचं आयोजन केलं होतं. त्या नाट्य प्रयोगाची ठरलेली रक्कम न दिल्याचा आरोप नाट्यनिर्मात्यानं केला होता. 


मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु


मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण 20 जुलैपासून सुरु केलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरेचा कायदा करणे, मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी  मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केलं आहे. 


संबंधित बातम्या :


मनोज जरांगेची तब्येत खालावली; बीपी अन् शुगरही कमी; डॉक्टरांकडून तपासणी, उपचाराचा सल्ला


Pravin Darekar on Manoj Jarange : मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? भाजप नेते प्रवीण दरेकरांचा उपोषणकर्ते मनोज जरागेंना सवाल