जालना : ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे सरकारने आम्हाला समाजावून सांगावे. मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागण्यांसह जालन्यातील वडीगोद्री गावात ओबीसी समाजाचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी गेल्या 6 दिवसांपासून उपोषण केले आहे. आज त्यांची प्रकृती खालावल्यानंतर ओबीसी समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ओबीसी बांधवांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. तर, सरकार जाणीवपूर्व आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. ओबीसीने एखादी दंगल केलेली ऐकली आहे का, ओबीसीने एखाद्या नेत्याला टार्गेट केलेलं ऐकले का, असा सवाल करत हाकेंनी नाव न घेता मनोज जरांगे (Manoj jarange) यांच्यावरही टीका केली. तसेच, बीडमध्ये हिंसक आंदोलन झालं, ते आपण सहन केलं. आपण बारा बलुतेदार, शोषिक, वंचित आहोत. आपणास वाचवायला कोणीही येणार नाही, त्यामुळे हिंसक आंदोलन करु नका, असे आवाहन त्यांनी आंदोलक समर्थकांना केले. दरम्यान, भुजबळांना टार्गेट करायचं आणि आम्हाला भाऊ म्हणतो का तू, आम्हाला कळत नाहीत का, असे म्हणत जरांगेंवर हल्लाबोल केला.


जालन्यातील व ओबीसी आंदोलक समर्थकांना आवाहन करत हाके म्हणाले की, कायदा हातात घेऊ नका, आपणाला गुन्हे दाखल करून घ्यायचे नाहीत. तुम्हाला सोडवायला कोणी आमदार खासदार येणार नाहीत, हिंसक आंदोलन करू नका. आपले नेते पुढचा प्रोग्राम ठरवतील, आपल्याला ह्या आंदोलनामध्ये कायदा हाती घ्यायचा नाही, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांना केले आहे.  शासनाला माझी विनंती आहे, आमच्या पोरांना सर्वकाही कळतंय, आता ते तुलना करत आहेत. एका आंदोलनाला रेड कार्पेट घातलं जातं आणि दुसऱ्या आंदोलनाकडे ढुंकूनही बघितलं जात नाही. आपली दखल घेतलेली नाही,  पण करायचं काय, असे म्हणत हाके यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. तसेच, शासन बोगस सर्टिफिकेट वाटत आहे, शासन ओबीसींचं नसेल तर आम्हाला जनतेच्या दरबारात जावे लागेल. आम्हाला डावलल जातोय ही आंदोलकांची भावना असल्याचंही त्यांनी म्हटलं. 


खरं कोण बोलतंय?, शासन की जरांगे


ओबीसी आरक्षणास धक्का कसा लागत नाही, हे केवळ सरकारने आम्हाला सांगावं. जरांगे म्हणतात की, आम्ही 80 टक्के मराठी ओबीसीमध्ये घुसलो आहोत. तर, शासन म्हणते आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाहीत. मग, शासन किंवा जरांगे यापैकी कोण खरं बोलतंय, याबाबतीत संभ्रम आहे, नैराश्याची भावना आहे. त्यामुळे, हे सरकारने स्पष्टपणे सांगावं, अशी मागणी हाके यांनी केली. 


लक्ष्मण हाकेंनी पाणी प्यायलं


ओबीसी बांधवांच्या भावनिक विनंतीला मान देत लक्ष्मण हाके यांनी अखेर पाणी प्यायले. हाके यांनी दोन दिवसानंतर आज कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पाणी घेतलं. ओबीसी बांधवांकडून लक्ष्मण हाके यांना पाणी पिण्यासाठी सातत्याने आग्रह केला जात होता. त्यामुळे, गेल्या दोन दिवसांपासून पाण्याचा थेंबही न घेतलेल्या हाके यांनी पाणी प्यायल्याने ओबीसी बांधवांनी समाधान व्यक्त केले. मात्र, ओबीसी आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचं दिसून आलं. 



भुजबळ यांना टार्गेट करता आणि आम्हाला भाऊ म्हणता


भुजबळ यांना टार्गेट करायचे आणि आम्हाला भाऊ म्हणायचं? आमच्या अन्नात माती कालवणारा तू आणि आम्हाला भाऊ म्हणतो?, आम्हाला कळत नाही का, येडं समजला का, असे म्हणत हाके यांनी थेट मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. आम्हा ओबीसींना रेड कार्पेट नको, आम्हाला रास्ता रोको करायचा असता तर आपण उपोषणाला बसलोच नसतो. सबसे बडा कायदा, सबसे बडा संविधान है, असेही हाके यांनी आपल्या भाषणात म्हटले. 


मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका


डॉक्टर पीएचडी असलेला मंत्री म्हणतो, मी मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून आलोय, अरे मग मंत्रिपदाचा राजीनामा देना, लाज वाटते आम्हाला तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री म्हणून शपथ घेतली, असे म्हणत हाके यांनी तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला.