अमरावती :  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्याकडून हाताने स्वत:चे पाय धुवून घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कृतीमुळे महायुतीमधील नेत्यांनी नाना पटोलेंवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच भाजपमधील एका नेत्याने  नाना पटोलेंच्या या कृतीचा निषेध नोंदवत थेट इशारा दिला आहे. नाना पटोले जिथे जिथे जातील तिथे त्यांना चिखलात लोळवण जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे कुठे कुठे धुवून घेतील हे त्यांना माहिती पडेल. काँग्रेसवाल्यांची ही मस्ती आहे. यात त्यांना थोडसं जरी यश मिळालं तर त्यांच्या डोक्यामध्ये सम्राटपणा जातो, सरंजामी जाते. सामान्य माणसांवर अन्याय करणे सुरू करतात. गुलामी सुरू करतात. त्यामुळे या गोष्टीचा सर्वांनी निषेध करावा, असे आवाहन भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलय. तसेच भाजप नाना पटोले यांना चिखल लावून या घटनेचा निषेध नोंदवणार, असा इशाराही  त्यांनी दिलाय.


अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांच्या डोक्यामध्ये मस्ती गेलीय - अनिल बोंडे


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःचे पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले यात नवल नाही. त्यांची हीच मानसिकत आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांना एवढ्या जागा आल्या म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती गेलीय. एका साध्या कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेणे. मी खूप मोठा आहे, सम्राट आहे आणि मी सगळं जग जिंकलं, अशा मानसिकतेतून नाना पटोले यांनी नेहमीप्रमाणे उद्दामपणा दाखवल्याचा हल्लाबोल भाजप नेते अनिल बोंडे यांनी करत नाना पाटोले यांच्या या कृतीचा निषेध नोंदवलाय. अशा लोकांची मस्ती जिरवल्याशिवाय उपाय नाही. सामान्य माणसाला कचऱ्यासारखे समजतात. आणि स्वतः चिखलाने भरलेले पाय धुवून घेतात. त्यामुळे या गोष्टीचा सर्वांनी निषेध करावा, असे आवाहन देखील अनिल बोंडे यांनी केले आहे.   


7 वर्षांपूर्वी भाजप नेत्यांकडूनही असाच प्रकार


अकोला जिल्ह्यातील वाडेगावात नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका काँग्रेस कार्यकर्त्याने धुवून दिले होते. या कृतीवरून राज्यभरात नाना पटोलेंवर राज्यभरात विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. मात्र, अशीच घटना सात वर्षांपूर्वी अकोल्यातच घडली होती. 25 मे 2017 रोजी अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे गावात भाजप नेत्यांनी आपले पाय शेतकऱ्यांकडून धुवून घेतल्याचा प्रकार घडला होता. भाजपच्या दीनदयाल उपाध्याय शेतकरी संवाद यात्रेदरम्यान हा प्रकार घडला होता. भाजपचे तत्कालिन खासदार संजय धोत्रे, महाराष्ट्र भाजपचे तत्कालीन संघटनमंत्री रवी भुसारी आणि आमदार रणधीर सावरकर यांचे पाय यावेळी शेतकऱ्यांनी धुतले होते.


विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनीही आनंदाने ह्या प्रकाराला विरोध न करता स्वत:चे पाय धूवून घेतले होते. काँग्रेससह विरोधकांनी या प्रकारावर तेंव्हा मोठी टीका केली होती. भाजपचे संघटनमंत्री रविंद्र भुसारी यांना पक्ष आणि संघाकडे स्पष्टीकरणही द्यावं लागलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचं पद गेलं होतं.


इतर महत्वाच्या बातम्या