Swati Maliwal Case: नवी दिल्ली : आपच्या (Aam Admi Party) खासदार स्वाती मालीवाल प्रकरणी (Swati Maliwal Case) दिल्ली पोलीस (Delhi Police) अॅक्शन मोडमध्ये आहेत. स्वाती मालीवाल यांचा विनयभंग केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे पीए विभव कुमार (Vibhav Kumar) यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन देखील दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. विभव कुमार यांचं नाव दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये असून चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती मिळतेय. 


दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाहून विभव कुमार यांना अटक केली आहे. त्यांना दिल्लीतील सिविल लाइन्स पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आलं आहे. विभव कुमार यांचं म्हणणं आहे की, त्यांना माध्यमांमधून एफआयआरबाबत माहिती मिळाली. तसेच, विभव कुमार यांनीही ईमेल मार्फत दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विभव कुमार यांनी दिल्ली पोलिसांना त्यांनी केलेल्या तक्रारीचीही दखल घ्यावी, असं आवाहनही केलं आहे. तसेच, त्यांना कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचंही विभव कुमार यांचं म्हणणं आहे. 


स्वाती मालीवाल यांच्या मेडिकल रिपोर्ट्समधून खुलासा 


स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्वाती मालीवाल यांचं म्हणणं आहे की, जेव्हा त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचल्या त्यावेळी त्यांच्यासोबत विभव कुमार यांनी गैरवर्तन केलं आणि त्यांच्यासोबत मारहाणही करण्यात आली होती. स्वाती मालीवाल यांच्या तक्रारींच्या आधारे दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरनंतर एम्समध्ये स्वाती मालीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्या रिपोर्टमध्ये हेदेखील सांगण्यात आलं आहे की, स्वाती डाव्या पायावर आणि उजव्या डोळ्याखाली जखमेच्या खुणा आहेत. स्वातीनं डोकेदुखी आणि मान ताठ असण्याचीही तक्रार केली आहे.