Sushma andhare on Ramdas Kadam : रामदास कदम यांच्यावर फार बोलून त्यांना महत्व देण्याची गरज वाटत नाही, इतरांना ईडी लावायची की नाही ते सोडून द्या. पण रामदास कदमांनी बोलताना डोळ्याला झेंडूबाम नक्की लाववा, असं प्रत्युत्तर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना दिले आहे. उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचारी कोण हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे, असं रामदास कदम यांनी म्हटले होते. तर  शिंदे गटातील 40 पैकी एकाही आमदाराने 50 खोके घेतले असं उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्याकडे जाऊन भांडी घासेन, सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी असंही  शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हंटलं होतं, यावर बोलताना रामदास कदम हे भांडी घासण्यावर फार लवकर येतात, प्रत्येक व्यक्तीला आपली पात्रता इतक्या लवकर कशी कळते असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय.


गुहागर घटनेवर सुषमा अंधारे काय म्हणाल्या ?


गुहागर येथे झालेल्या राणे समर्थक आणि भास्कर जाधव यांच्यात झालेल्या राड्याप्रकरणी भाजपने उद्धव ठाकरे गटाकडे मुद्दे राहिले नाहीत असा आरोप केला होता. यावर उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. भाजपाने अगदी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होण्या इतपतची गुंडागर्दी वाढवली असून घोसाळकरांचा मृत्यू असेल किंवा  निखिल वागळे यांच्यावरचा हल्ला असेल तिथपर्यंतची गुंडागर्दी वाढवली भाजपकडून ही भाषा शोभत नसल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थोडा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलंय.


 वांद्रे रेक्लेमेशनवरही दिली प्रतिक्रिया -


वांद्रे रेक्लेमेशनच्या जागेसंदर्भात आम्ही मोर्चा काढला होता आणि तेव्हा देखील आम्ही सांगितल होतं. ही जागा आम्ही अदानीच्या घशात जाऊ देणार नाही. मात्र त्यांनी जास्तीचा टेंडर भरला आणि न्यायालयाने जागा देण्याचा निर्वाळा दिला. मात्र मला असं वाटत मुख्यमंत्री ,, उपमुख्यमंत्री यांना ज्या कामासाठी त्या जागेवर बसविण्यात आले आहे ते त्यांचे काम चोखपणे पार पाडत आहेत.   त्यामुळे आज "सब भूमी अदानीकी है" हे मोदींनी ठरवून घेतले आहे. गोरगरिबांनां काही मिळो अथवा न मिळो मात्र सगळ्या प्रकारे त्यांच्या मित्रांना मदत झाली पाहिजे आणि फडणवीस असतील किंवा शिंदे असतील हे दोघे गुजरातचे मुनीम म्हणून वागत आहेत, असं सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे.


धनगर आरक्षणावर काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?


धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. हायकोर्टानं सांगितलं की अनुसूचित जातींना हात लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना सुद्धा नाही, फक्त संसदेत कायद्यानंच ते बदलता येईल, मग महाराष्ट्र सरकारनं कोणत्या आधारावर धनगर आरक्षणाची ग्वाही दिली होती, यावरून सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार संसदेला आहे. मात्र वाशीमध्ये अधिसूचना काढून डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न झाला. तसेच सरकारमध्ये बसलेल्या कुठल्याही लोकांचा अभ्यास नाही, अभ्यास नसला तरी सुद्धा जाणीवपूर्वक लोकांच्या भावनेशी खेळून आरक्षणाचे नावावर अठरापगड लोकांमध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकार मध्ये होत  आहे.  विकासाचे कुठलेही मुद्दे नसल्याने आपापसात झुंजवत ठेवणं यांची मजबुरी आहे.