Sushma Andhare : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा सालियनचे (Disha Salian) मृत्यू प्रकरण आज विधिमंडळात चांगलेच गाजले. याच मुद्द्यावर चर्चा होत असताना मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर झालेल्या आरोपांचा संदर्भ आला. हाच संदर्भ देताना आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर चित्रा वाघदेखील चांगल्याच संतापल्या. यावरच शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाच्या नेत्या तथा आमदार चित्रा वाघ यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी चित्रा वाघ यांचे नाव न घेता केलेली ही टीका सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय.  


सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या? 


सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर आपलं मत मांडलंय. 'सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत  एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा-कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय.त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!' असं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यांच्या या विधानाची सध्या सगळीकडेच चर्चे होत आहे. 


चित्रा वाघ सभागृहात का संतापल्या?


दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका करत दिशाच्या मृत्यूची चौकशी पुन्हा करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी दिशाच्या मृत्यूप्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचाही संबंध आहे, असा आरोप केला आहे. त्यानंतर हाच मुद्दा विधिमंडळाच्या सभागृहात उपस्थित झाला. आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. तर विरोधी बाकावर बसलेल्या ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आदित्य ठाकरे यांचा बचाव करताना शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले. हे सर्व सांगताना त्यांनी भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांच्यावरही टीका केली. त्यानंतर अनिल परब यांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात उत्तर दिले. हाच संदर्भ घेऊन सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. 






चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या होत्या?


चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना उद्देशून भाषण केले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी करा ही मागणी करताना माझी भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडली. मात्र संजय राठोड यांना क्लिनचीट कोणी आणि का दिली? हे अनिल परब यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारावं असं आव्हान दिलं. तसेच परब यांना उद्देशून चित्रा वाघ तुमच्यासारखे 56 अनिल परब पायाला बांधून फिरते, असेही त्या म्हणाल्या. याच विधानाचा आधार घेत सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. 



हेही वाचा :


बेंझीन केमिकल, कापडाच्या चिंध्या अन् मोठा ब्लास्ट, हिंजवडीच्या भीषण आगीमागे ड्रायव्हरचा 'क्रिमिनल माईंड'; मृत्यूचा खेळ कसा रचला?  


Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार