बीड : जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांचे नाव घेतल्याने वेगळाच वाद सुरू झाला होता. आमदार धस यांनी सांस्कृतिक परळी पॅटर्नचा दाखला देत नाव घेतल्यानंतर प्राजक्ता माळी यांनीही पत्रकार परिषद घेऊन, सुरेश धस (Suresh Dhas) यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र, मी माफी-बिफी मागत नसतो असे धस यांनी म्हटलं होतं. मात्र, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आमदार धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांचं जर मन दुखावलं असेल तर प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हटलंय. त्यामुळे, माफीवरुन दोन दिवसांतच धस यांची भूमिका बदलली असून त्यांनी युटर्न घेतल्याचं पाहायला मिळालं.
प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषय नव्हता. मी प्राजक्ताताई सह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने, त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे सुरेश धस यांनी म्हटलं. दरम्यान, मला भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा फोन आला नाही, किंवा कुणी माफीसाठी दबाव टाकला नाही. केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माझं बोलणं झालं, असेही धस यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील यांचा फोन
माझ्याशी कोणीही संपर्क केला नाही, मला फक्त चंद्रकांत दादांचा फोन आला होता. चुकलो किंवा नाही चुकलो तरीही तू क्षमा मागून टाक असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, एक मिनिटांत माफी मागतो असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली असल्याचंही सुरेश धस यांनी म्हटलं. माझ्याकडून चुकलेलं काही नाही, तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा फोकस हा संतोष देशमुख यांचा झालेला खून, त्याची पुढील प्रक्रिया यावर आहे. माझ्या हातानेच मी ती लिहिलेलं आहे, एखादा शब्द इकडं-तिकडं होऊ नये म्हणून मी स्वत:च ते लिहून वाचलं आहे. मी ग्रॅज्यूएट आहे, असेही सुरेश धस यांनी म्हटले.