बीड : अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांचं जर मन दुखावलं असेल तर प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हटलंय. आमदार सुरेश धस यांनी एक व्हिडीओ जारी करत प्राजक्ता माळी यांचं मन किंवा इतर कोणत्याही स्त्रीचं मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलं. यानंतर सुरेश धस यांनी एबीपी माझा सोबत फोनवरुन संवाद साधला. यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केली.
सुरेश धस यांना दिलगरीच्या निर्णयाबाबत विचारलं असता ते म्हणाले, मी निर्णयावर येण्याचा प्रश्न नाही, कालपासून मी तर तसा, मला असं वाटतं की मी थोडासा ग्रामीण भागातील आहे. माझ्याकडून चुकलेलं तर काही नाही.प्राजक्ताताईंच्याबाबतीत मी प्राजक्ताताई म्हटलंय, याच्या उपर त्यांना काही वाटलं असेल तर दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त करण्यात काही वाईट नाही, लहान होण्यात मला माझ्या आयुष्यात कधी कमीपणा वाटलेला नाही, असं सुरेश धस म्हणाले.
जर त्याचा इश्यू होत असेल, विनाकारण प्रकरण लांबत असेल, कारण माझा स्वत:चा फोकस संतोष देशमुख यांचा झालेला खून आणि त्याची पुढची प्रक्रिया करणं याला प्राधान्य देणं आहे. हे प्राधान्य देताना कुणाला वाटलं तर माझ्याबद्दल, काही सुरेशचं हे चुकलेलं आहे. तर मी दिलगिरी व्यक्त करुन मोकळा झालो. पुन्हा एकदा फोनोच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतोय, असं सुरेश धस म्हणाले.
दिलगिरी व्यक्त करतानाची वाक्य वाचून दाखवत असल्याबाबत विचारलं असता सुरेश धस म्हणाले की वाचून दाखवतानाचं नाहीये, शब्द जरा इकडे तिकडे होऊ नये म्हणून माझ्या हातानं मी लिहिलेलं आहे. मला कुणी लिहून द्यायची गरज नाही, मी ग्रॅज्युएट आहे. विशेषता: महिलांच्या बाबतीत बोलत असताना एखाद दुसरा शब्द इकडं तिकडं जाऊ नये म्हणून माझ्या हातानं लिहून घेतलेलं आहे.
सुरेश धस पुढं म्हणाले, आता दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मागं जाऊ नका, हा विषय संपवून टाका. माझा कुणाशी संपर्क नाही. माझा मी निर्णय केला. मला फक्त चंद्रकांत दादांचा फोन आला होता. दादांना म्हटलं मी काही चुकलेलो नाही. ते म्हणाले की चुकलो नाही चुकलो जर इतरांना कुणाला वाटलं असेल तू चुकलाय तर क्षमा मागून टाक, मी म्हटलं एका मिनिटात क्षमा मागतो, संपला विषय, असं सुरेश धस म्हणाले.
मी माझ्या कुठल्याही वक्तव्यात मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास नाही असं म्हटलेलं नाही. मुख्यमंत्री आमचे नेते आहेत. त्यांच्याच मुळं मी इथं बोलत आहे. माझाच नाही महाराष्ट्रातील 13 कोटी जनेतचा पूर्ण विश्वास माननीय मुख्यमंत्र्यांवर आहे, असं सुरेश धस म्हणाले. माझ्या भूमिकेमुळं सरकारची अडचण होत नाही. अडचण होण्याचं कारण काय? ज्यांच्यावर आरोप करतोय, ते मंत्री असले तरी काय, त्यांचे शागीर्द चुकले असतील तर त्याचं समर्थन करायचं काय?, असं सुरेश धस म्हणाले.
एक लाख लोकांचा मोर्चा निघाला होता, तिथं जितेंद्र आव्हाड, प्रकाश सोळंखे, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडांचे सासरे, एक लाख लोकं उपस्थित होते, त्यांच्या मनात सरकारबाबत रोष दिसला नाही. मुख्यमंत्र्यांबाबत टाळ्या वाजवत होते. प्रश्न आमच्या बीडचा आहे, जिल्ह्याचं जंगलराज होतंय, त्याबाबत प्रश्न आहे. मोक्का लावण्याची मागणी, खंडणीचा गुन्हा दाखल केला, 302 चा गु्न्हा दाखल केला. एसआयटी लावण्याची माझी मागणी आहे. साहेबांनी निगेटिव्ह भूमिका घेतलेली नाही, असं सुरेश धस म्हणाले.
इतर बातम्या :
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न