बारामती: राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सकाळी मतदान सुरु असताना सर्वांनाच बुचकाळ्यात टाकणारी एक घटना घडली. गेल्या महिनाभरापासून बारामतीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटात निकराचा संघर्ष सुरु आहे. या संघर्षामुळे पवार घराण्यात फूट पडण्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण झाले आहे. या दोन्ही गटांमध्ये पडलेली ही दरी पुन्हा सांधता येणार नाही, इतके हे वैर टोकाला गेले होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सर्वांनाच धक्का देणारी एक कृती केली आहे.


सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी सहकुटुंब मतदान केले. त्यानंतर सुप्रिया सुळे कोणालाही सोबत न घेता थेट काटेवाडी येथील अजित पवारांच्या घरी जाऊन पोहोचल्या. सुप्रिया सुळे अचानक अजितदादांच्या घरी गेल्याने राजकीय वर्तुळाला प्रचंड मोठा धक्का बसला. ही भेट नेमकी कशासाठी होती, हे अद्याप समजलेले नाही. मात्र, या भेटीमुळे बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या या भेटीमुळे आता पुढील काळात काय घडणार, याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


सुप्रिया सुळे यांच्या या कृतीचा नेमका अर्थ काय?



एक निश्चित निवडणुकीनंतर कुटुंबात निर्माण झालेली कटुता दूर करण्याचे प्रयत्न होतील, हे स्पष्ट होते. मात्र, मतदान सुरु असताना आपण जी टोकाची भूमिका घेतली आहे कौटुंबिक वादात, हे कुटुंब उद्या एकत्र आलं त्याचे परिणाम आपल्या राजकीय भविष्यावर होऊ शकतील, यावरुन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. बारामतीत स्थानिक पातळीवर सध्याच्या घडीला कटुता आली आहे, पवारांची मतपेढी विभागली गेली आहे. प्रचारात आलेली कटुता एका भेटीने दूर होणार नाही. पण सुप्रिया सुळेंनी मतदान सुरु असताना अजितदादांच्या भेटीला जाऊन मतदारांमध्ये एकच गोंधळ उडवून दिला आहे, असे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले. 


या भेटीमुळे सुप्रिया सुळे यांना फायदा होऊ शकतो. बारामतीचा मतदानाचा आतापर्यंतचा पॅटर्न लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, असा राहिला आहे. हा पॅटर्न ब्रेक करण्यासाठी अजित पवार महिनाभर संघर्ष करत होते. पण अशा भेटीमुळे निश्चितपणे लोकांना पुन्हा त्याच पॅटर्नकडे वळावसं वाटलं, तर आश्चर्य वाटणार नाही. लगेच त्याचे सगळीकडे परिणाम होणार नाहीत. पण सुप्रिया सुळे यांनी पवार घराण्यातील कटुता दूर करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांना फायदा होऊ शकतो, असे मत देशपांडे यांनी व्यक्त केले.


आणखी वाचा


सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी, बारामतीत सर्वात मोठा ट्विस्ट!