मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावलेले पाहायला मिळतात. यशवंतराव चव्हाण यांचा फोटो अजित पवार गटाकडून वापरण्यास सुरुवात केल्यानंतर सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार गटावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवर संघाबाबत यशवंतराव चव्हाण यांचं मत काय होतं याबाबत यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहलेले मत ट्विट केले आहे.  


सरकारमध्ये शंभर दिवस पूर्ण झाल्यानं अजित पवार यांनी जनतेसाठी पत्र लिहलंय. पत्रात त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केलाय. पत्रात यशवंतराव चव्हाणांचा वारंवार उल्लेख केला आहे. शरद पवार यांनी होर्डिंग अजित पवार गटाला माझा फोटो वापरू नये, असं सुनावलं होतं. त्यानंतर आता शरद पवार यांचा फोटो वगळून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो  बॅनरवर झळकले आहेत. या सर्व प्रकारानंतर  सु्प्रिया सुळेंनी आरएसएसबाबत यशवंतराव चव्हाणांचे काय मत होते हे ट्विट करत भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांवर टीका केली आहे. आरएसएस म्हटले की मी चार पावले दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्यांच्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो, असे यशवंतराव चव्हाणांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे 


यशवंतराव चव्हाण यांनी काय म्हंटल होतं?


मी समजलो की (डॉक्टर हेडगेवार) यांना फक्त एका विशिष्ट वर्गाच्या लोकांची फॅसिस्ट संघटना बनवायची आहे. आपल्याला यात काही कर्तव्य नाही. तेव्हापासून आरएसएस म्हटले की मी चार पावले दूर राहिलो आहे.माझ्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.


एकीकडे यशवंतराव चव्हाण यांचे नाव घ्यायचं आणि दुसरीकडे यशवंतराव चव्हाण यांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्यासोबत जायचं हा विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न  सुप्रिया सुळेंनी केला आहे.


 






काय म्हणाले आपल्या पत्रात अजित पवार?


वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं 'बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व' हे सूत्र माझी प्रेरणा आहे, हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचांवर मांडले आहे. याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी हाती घेतलेला 'वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा' हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सत्तेत असण्याचे सूत्र राहणार आहे, यांची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देऊ इच्छितो.


हे ही वाचा :