Supriya Sule On Abdul Sattar: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली होती. यावरून राज्यभरात राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र आहे. अशातच आता या वादावर स्वतः सुप्रिया सुळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणल्या आहेत की, ''महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले. याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात'', असं त्या म्हणल्या आहेत. त्या ट्वीट करून असं म्हणाल्या आहेत.  


एका मागून एक असे ट्वीट करत त्या म्हणाल्या आहेत की, ''मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया.'' त्या म्हणाल्या की, याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा सुसंस्कृतच महाराष्ट्र आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले, असं म्हणता त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तत्पूर्वी, सत्तार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिकिया देताना सुप्रिया सुळे सोमवारी म्हणाल्या होत्या की, ''मी यावर भाष्य करणार नाही.''   


काय म्हणाले होते अब्दुल सत्तार? 


माध्यमांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य करत अब्दुल सत्तार म्हणाले होते की, आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार** आहेत. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठीही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. दरम्यान, त्यांनी आपल्या या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. ते म्हणाले आहेत की,  "मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील  तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो.''