Devendra Fadnavis On Abdul Sattar : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, तसंच त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. अब्दुल सत्तार बोलले त्याचं मी समर्थन करणार नाही, ते चूकच आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच "राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे," असं मतही त्यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत बोलत होते.


दोन्ही बाजूच्या लोकांनी आचारसंहिता पाळली पाहिजे : देवेंद्र फडणवीस
अब्दुल सत्तार शिवीगाळ प्रकरणावर विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. ते अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोधच करु. हे जसं आमच्याकडच्यांना लागू आहे तसं त्यांना देखील लागू आहे. आज मला त्यात जायचं नाही. मला असं वाटतं राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे. अब्दुल सत्तार बोलले त्याचं मी समर्थन करणार नाही. ते चूकच आहे. पण त्याचवेळी खोके, उलटसुलट बोलणं हे देखील चुकीचं आहे. तेही समजून घेतलं पाहिजे. दोन्ही बाजूने आचारसंहिता पाळणं अत्यंत गरजेचं आहे. पातळी अतिशय खाली चाललेली आहे. राजकारणाची ही पातळी महाराष्ट्रात असू नये असं मला वाटतं. त्याकरता जोपर्यंत मोठे नेते आपापल्या लोकांना सांगत नाहीत तोपर्यंत हे शक्य होणार नाही. अन्यथा नेत्यांनी वेगळं बोलायचं आणि त्यांच्या लोकांनी बोललं की त्यांचं समर्थन करावं. त्यामुळे सगळीकडच्या लोकांनी आचारसंहिता पाळली पाहिजे, असं मला वाटतं."


आक्षेप असेल तर सनदशीर पद्धतीने मांडा, मारहाण सहन केली जाणार नाही : उपमुख्यमंत्री
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या राड्याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हर हर महादेव सिनेमा मी पाहिलेला नाही. त्यात काय वाद आहे मला माहित नाही. कोणालाही विरोध करायचा असेल तर लोकशाही मार्गाने करावा. कोणाला सिनेमाबद्दल जर आक्षेप असतील तर त्यांनी सनदीशीर पद्धतीने मांडावे, पण अशा पद्धतीने कुणी थिएटरमध्ये घुसून लोकांना मारत असेल तर ते सहन केले जाणार नाही. कारवाई केली जाईल."


संबंधित बातमी