Ajit Pawar Silence : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादीतील प्रत्येक मंत्र्याने याचा निषेध केला. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र 24 तास उलटले तरी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सोमवारी (7 नोव्हेंबर) अब्दुल सत्तार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात निदर्शने तर केलीच शिवाय अब्दुल सत्तार यांचा मुंबईतील निवासस्थान आणि सिल्लोड येथील निवासस्थानी जाऊन आंदोलन करत तोडफोड देखील केली. तोडफोडीनंतर आता सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
EWS आरक्षण निर्णयाचं स्वागत, मात्र सुप्रिया सुळेंबाबत घडलेल्या घटनेची दखल नाही
सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतल्या सर्वच नेत्यांनी सोशल मीडियावर निषेध असेल किंवा स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. मात्र या सगळ्यामध्ये अजित पवार कुठेही पाहायला मिळाले नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे याची दखल त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर देखील घेतली गेली नसल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवार यांचं ट्विटर हॅण्डल जर पाहिलं तर त्यावर प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहायला मिळते. सोमवारचंच आणखी एक उदाहरण पाहिलं तर ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत करणारं ट्वीट याठिकाणी पाहायला मिळतं. परंतु त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याबाबत घडलेल्या घटनेची कसलीच नोंद पाहायला मिळत नाही. त्यामुळे अजित पवार नेमके कुठे आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
अजित पवार परदेशात असल्याची सूत्रांची माहिती
शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरातून दुसऱ्याच दिवशी गायब झालेले अजित पवार नेमके कुठे गेले याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सध्या अजित पवार परदेशात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मंगळवारी (8 नोव्हेंबर) ते मुंबईत परतणार असून दुसऱ्याच दिवशी पुन्हा कामाला लागणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. अजित पवार त्यांच्या घरगुती कामासाठी बाहेर गावी आहेत, ते नाराज नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं होतं.
गजानन काळे, नीलम गोऱ्हे यांची टिप्पणी
विरोधकांनी मात्र याचा चांगलाच खरपूस समाचार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. शिर्डी येथील शिबिरात अजित पवारांची अनुपस्थिती म्हणजे दादा नाराज तर नाहीत ना, गुवाहटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा रे कुछ तो गडबड है, असं ट्वीट मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलं होतं तर दुसरीकडे शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी अजित पवार यांची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही असं म्हटलं होतं.
राष्ट्रवादीत गडबड तर नाही?
दिल्ली येथील अधिवेशनात अजित पवार यांची समोर आलेली नाराजी त्यानंतर पुन्हा शिर्डी येथील शिबिरातून अचानक गायब झालेले अजित पवार हे आपल्या बहिणीवर आलेल्या संकटावेळी देखील कुठेच पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात काही गडबड तर सुरु नाही ना अशी शंका राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.