मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून लवकरच त्याबाबत घोषणा होऊ शकते. परंतु, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हे जागावाटप होण्यापूर्वीच एक अनपेक्षित कृती केली आहे. सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी आपल्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवर एक फोटो लावला. यामध्ये त्यांनी स्वत:ला बारामती लोकसभेचा (Baramati Loksabha) उमेदवार म्हणून जाहीर केले. या स्टेटसमध्ये शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे या तिघांचेही फोटो आहेत. तसेच नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) चिन्ह असलेला तुतारी वाजवणारा माणूस सुळे यांच्या स्टेटसवर झळकत होता. सुप्रिया सुळे यांनी अशाप्रकारे तडकाफडकी स्वत:ची उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या.  


या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, मी बारामतीमधून स्वत:ची उमेदवारी जाहीर केलेली नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीकडे मला बारामतीची उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. मी बारामतीमधून लढण्यासाठी इच्छूक आहे. त्यामुळे मी डिझाईन करुन स्टेटसला ठेवले.  आता मला तिकीट मिळावे, ही माझी विनंती आहे. माझी संसदेतील कामगिरी आणि बारामती मतदारसंघात झालेला विकास याचा विचार करुन इंडिया आघाडीने मला संधी द्यावी, अशी विनंती मी सोनिया गांधी, उद्धव ठाकरे या सगळ्यांना केल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.



सुनेत्रा पवार तुमच्याविरोधात रिंगणात उतरल्यास काय कराल? सुप्रिया सुळे म्हणाल्या...


यावेळी सुप्रिया सुळे यांना बारामतीमधून तुमच्याविरोधात सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्यास काय कराल, असे विचारण्यात आले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी फार भाष्य करण्यास नकार दिला. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. माझी लढाई ही एखाद्या व्यक्तीविरोधात नाही तर भाजपच्या चुकीच्या धोरणांविरोधात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीची समस्या यासरखे असंख्य प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मला उमेदवारी हवी आहे. मी पवार कुटुंबाची लोकप्रतिनिधी नाही, तर देशाची लोकप्रतिनिधी आहे. मी संसदेत एक नंबरची खासदार आहे, हे लोकसभा अध्यक्ष आणि भाजपचा डेटा आहे. मी पवारांची लेक किंवा सुळेंची सून म्हणून तिकीट मागत नाही. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तत्त्वांना अनुसरुन काम करणारी लोकप्रतिनिधी या नात्याने  पक्षाकडे तिकीट मागत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत पवार कुटुंबीयांना खेचण्याची गरज नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.   


आणखी वाचा


नमो रोजगार मेळाव्याचं आमंत्रण आलंच नाही; आलं तर नक्की जाईन: सुप्रिया सुळे