सोलापूर: आज जनसन्मान यात्रेच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाव न घेता कारवाईचा इशारा दिला आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी नाव न घेता उमेश पाटील यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल. त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम पक्ष नक्की करेल,’ अशा कठोर शब्दांत सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांना सुनावलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) जनसन्मान यात्रा आज सोलापूर जिल्ह्यात मोहोळ शहरात पार पडली. जनसन्मान यात्रेच्या सभेत बोलताना आमदार यशवंत मानेंनी (Yashwant Mane) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतात. माजी आमदार राजन पाटील आणि माझ्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर बोललं जातं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, अशी मागणी केली. त्यानंतर आता अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांना सुनावलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराा त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल. त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच करेल, एवढा विश्वास देतो, अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांना नाव न घेता तंबी दिली आहे.
मोहोळ अपर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून मोहोळ बचाव संघर्ष समितीकडून मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांचे विश्वासू समजल्या जाणारे, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीही बंदला पाठिंबा आहे. त्यावरुन, आमदार यशवंत माने यांनी अजित पवारांकडे उमेश पाटील यांची तक्रार केली होती. त्यातच, अजित पवारांनी मोहोळमधील आपल्या भाषणातून उमेश पाटील यांना शेलक्या शब्दात सुनावलं आहे.
कोण कोण काय काय सांगतय, त्याचा उल्लेख मगाशी तटकरेसाहेबांनी केला. मधीतरी कोणतरी पट्ट्या म्हटला, दादांचा दौरा मी रद्द केला. अजित पवारने आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचाय, असे म्हणत उमेश पाटील यांच्यावर निशाणा साधला. तसेच, पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे मी माझा दौरा पुढे ढकलल्याची माहिती दिली. तसेच, बैलगाडी खाली एक कुत्र चाललेलं असतंय, त्याला वाटतं मी गाडी आढतोय. पण, अरे तुझ्या पुढं बैलं आहेत, ती ही गाडी आढतायंत, तू देवळातली घंटा हलवतो का?, अशा शब्दात अजित पवारांनी नाव न घेता उमेश पाटलांना नाव न घेता झापलं आहे.