सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj) कोसळल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. जनतेच्या तीव्र भावना आणि विरोधकांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरल्याने पोलीस प्रशासन व सत्ताधारी नेत्यांकडून कारवाई करण्यात आली. तसेच, याप्रकरणात संबंधित शिल्पकार आणि पुतळा डिझाईन बनवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही करण्यात आली. तर, याप्रकरणात पुतळा बनवण्यासाठीची निविदा झालेला खर्च आणि कार्यक्रमावर करण्यात आलेल्या पैशांची उधळणही चर्चेचा मुद्दा ठरला आहे. आता, याप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुतळा बनवणाऱ्या आपटेला आत्तापर्यंत 26 लाख रुपये पोहोच झाले आहेत, म्हणजे 2.40 कोटी रुपयांच्या पुतळा उभारण्यात मोठा भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचे उघड होत असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav naik) यांनी म्हटलंय. 


सिंधुदुर्गमधील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा 2.40 कोटीं रुपयांचा असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. तर, पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे 2.2 कोटी झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. आता, आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराजांचा पुतळा बनवणाऱ्या शिल्पकार जयदीप आपटे याला महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत एकूण 26 लाख रुपये पोहोचले आहेत, त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत असल्याचे नाईक यांनी म्हटलंय. 


हेलिकॉप्टरमधील इंधनाचा खर्चही जिल्हा नियोजनचा


जिल्हा नियोजन विभागाकडून 5 कोटी 54 लाख 35 हजार रुपये नौसेना दिनाला खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन आणि नौसेना दोन्हीकडून पैसे खर्च करून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून नौसेनेने जो कार्यक्रम मालवणमध्ये केला त्या कामाच्या पैशातून नारायण राणेंसाठी लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचा गंभीर आरोपही वैभव नाईक यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन देखील जिल्हा नियोजनच्या पैशातून टाकलं गेल्याचा आरोप नाईक यांनी केलंय.


निलेश राणेंनी अद्याप पुरावे का दिले नाहीत


पुतळा कोसळल्यानंतर पाच ते सहा दिवसांत, त्यात माझा हात असल्याचे पुरावे देतो असे निले्श राणे यांनी म्हटले होते. मात्र, आता एक महिना पूर्ण होत आला तरी ते माझ्याविरुद्धचे पुरावे देऊ शकेल नाहीत. लोकांचे लक्ष भ्रष्टाचाराकडून दुसरीकडे वळविण्यासाठी त्यांनी असे आरोप केले होते, असेही नाईक यांनी यावेळी म्हटले. 


हेही वाचा


जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च