मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन राष्ट्रवादी पक्ष उदयास आले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात नव्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्थापन झाला असून मूळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाला आहे. त्यामुळे, या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सातत्याने या ना त्या कारणावरुन राजकीय खलबतं पाहायला मिळतात. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत असतात, तर कधी इकडचे नेते तिकडं आणि तिकडचे नेते इकडे येणार असल्याचा दावा दोन्ही पक्षातील नेत्यांकडून केला जातो. त्यातच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनीही मोठा दावा केला आहे. निवडणूक निकालानंतर शरद पवार यांच्या पक्षातील काही नेते काँग्रेसमधील जातील, असे तटकरे यांनी म्हटलं. त्यावर, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवकचे नेते मेहबुब शेख यांनी भूमिका मांडली आहे. 


शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँगेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. तटकरे यांनी पत्रकारांच्या अनौपचारिक चर्चेत हा मोठा दावा केल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. आता, यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून भूमिका मांडण्यात आली आहे. ''4 जूनच्या नंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार बाहेर पडणार आहेत. कारण 4 जूननंतर अजित दादांची नौका बुडणार आहे. त्या बुडणाऱ्या नौकेत आता कोणी बसणार नाही. म्हणून स्वतः सुनील तटकरे हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये त्याठिकाणी नावेत बसण्याची तयारी करत आहेत, असे मेहबुब शेख यांनी म्हटलं आहे. 


अजित पवार गट पराभवाच्या मानसिकतेत 


भारतीय जनता पार्टीत जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. कारण त्यांना माहिती आहे की आता आपल्याला शरद पवार साहेबांकडे एंट्री मिळणार नाही. जे लोक शरद पवार साहेबांवर, सिल्व्हर ओकवर प्रेम करतात तेवढीच लोक आता आमच्या पक्षात शिल्लक राहिली आहेत. जे जाणारे होते ते आता गेलेले आहेत. त्यामुळे अजून कोणी जाणार नाही. पण आपण बघितलं असेल गरवारे क्लबच्या बैठकीमध्ये अजित पवार गट हा पूर्ण पराभूत मानसिकतेमध्ये गेलेला आहे. आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड आणि स्टेटमेंट हे अजित पवार गटातली मंडळी करत असल्याचे मेहबुब शेख यांनी म्हटलं. 


काय म्हणाले सुनील तटकरे


शरद पवार यांच्या पक्षातीतल आमदारांकडून गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही भेट कोणत्याही क्षणी होऊ शकते, असेही बोलले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या या दाव्यानंतर राजकीय चर्चा रंगली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये सोनिया दुहान, धीरज शर्मा आदी नाराजांचा गट सोनिया गांधींसोबत जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. मात्र, नेमके कोण आमदार जाणार हे तटकरे यांनी सांगितलं नाही. अंतर्गत नाराजीने पाच ते सहा आमदार  दिल्लीमध्ये सातत्याने जातात, असेही त्यांनी म्हटले आहे.