Sunil Prabhu on Tanaji Sawant : बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा (Fake Medicines) पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि तात्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant) यांच्यावर टीका केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या सगळ्याच प्रकरणाची चौकशी करावी. तसेच त्यावळचे तत्कालीन मंत्र्याची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.
तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात घेऊ नये
दरम्यान, या प्रकरणामध्ये जे जे अधिकारी यामध्ये होते त्यांना शिक्षा करावी. कारण ते रुग्णांच्या जीवाशी खेळले आहेत असेही ते म्हणाले. तानाजी सावंत मागील अडीच वर्ष या पदावर होते. त्यांनी मागील एका वर्षात यावर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळं मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, मंत्री सुद्धा यामध्ये असतील तर त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात घेऊ नये असे प्रभू म्हणाले. ठाणे भिवंडीमध्ये या सगळ्या रॅकेटचे कनेक्शन असल्याचे प्रभू म्हणाले. जे जे कोणी या सगळ्यामध्ये आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असंही प्रभू म्हणाले.
एका बाजूला तानाजी सावंतांना आरोग्यमंत्री करण्याची मागणी तर दुसऱ्या बाजूला...
दरम्यान, एका बाजुला मंत्रिमंडळ विस्तारात आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांना पुन्हा एकदा समाविष्ट करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तसेच त्यांना पुन्हा आरोग्य मंत्रीपद द्यावे असीही मागणी होतेय. या मागणीसाठी आज पंढरपुरातील नामदेव पायरी येथे शेकडो वारकऱ्यांनी भजन करीत विठुरायाला साकडे घातले. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. आषाढी व कार्तिकी या दोन महायात्रांमध्ये वारकऱ्यांसाठी मोफत महा आरोग्य शिबिर राबवल्याने लाखो वारकऱ्यांना याचा लाभ झाला होता. यामुळेच पुन्हा यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात सावंत यांच्याकडे आरोग्यमंत्रीपद देण्यात यावे व अशीच वारकऱ्यांची सेवा महायुती सरकारकडून घडावी अशी मागणी वारकरी संप्रदायातील महाराजांनी केली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला तानाजी सावंत यांनी मंत्रीमंडळात संधी देऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
स्वाराती रुग्णालयातील अॅझिमसिम 500 या गोळीचे नमुने, 10 ऑगस्ट 2023 रोजी तत्कालीन औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तपासणीसाठी घेतले होते. मुंबईच्या प्रयोगशाळेकडून याचा तपासणी अहवाल एक वर्षानंतर, 18 ऑक्टोबर 2024 रोजी मिळाला. ई-टेंडरिंगद्वारे 25 हजार 900 गोळ्यांचा पुरवठा कोल्हापूरच्या विशाल एंटरप्रायजेसने, 29 जुलै 2023 रोजी केला होता. आता हा पुरवठा स्वराती रुग्णालयात शिल्लक नसून ही कंपनीच अस्तित्वात नसल्याचं तपासात उघड झालं आहे. काबीज जेनेरिक हाऊस विरोधात बनावट औषध पुरवठ्याबाबत यापूर्वी वर्धा व भिवंडी येथेही गुन्ह्याची नोंद आहे. संचालक विजय चौधरीला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. आंतरराज्य टोळीचा यात समावेश असण्याची औषध विभागाला शंका आहे. ही कंपनीच दिलेल्या पत्त्यावर अस्तित्वातच नसल्याचे समोर आले आहे..
महत्वाच्या बातम्या: