अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारासाठी अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी अक्षरशः पायाला फिंगरी बांधली आहे. जोरदार प्रचार सुरू उमेदवारांनी सुरू केला आहे. या प्रचार आतापर्यंत सुजय विखेंनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सुजय विखेंनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते, मतदार संघात साखर-डाळ वाटप केलं. 


सुजय विखेंची प्रचारात आघाडी


आता उमेदवारी जाहीर होताच सुजय विखेंनी महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा घेतला, भाजपची निवडणूक पूर्वतायरी बैठक घेतली, शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा घेतला. एवढ्यातच न थांबता त्यांनी आज थेट जिल्ह्याच्या बाहेर जाऊन कामोठे येथे नागरिकांच्या भेटी घेण्याचे ठरवलं आहे. कामोठे येथे पारनेर तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर राहतात. 


निलेंश लंकेंच्या प्रचारासाठी मविआत समन्वय नाही?


प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके यांच्या पारनेर तालुक्यातील नागरिकांची थेट कामोठे येथे भेटी गाठी घेऊन सुजय विखे प्रचार करणार आहेत. तर दुसरीकडे निलेश लंके यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी शिवस्वराज्य यात्रा आणि शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित केल होतं. सध्या निलेश लंके हे लोकसभा मतदारसंघात स्वाभिमान जनसंवाद यात्रा करत आहे. मात्र निलेश लंके यांनी मविआतील घटक पक्षाचे मेळावे काही घेतलेले दिसत नाही. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील त्यांच्या जनसंवाद यात्रेत दिसत नाहीय, त्यामुळे सध्या तरी सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.


सुजय विखेंचा निलेश लंकेंवर निशाणा


समन्वय ठेवून राजकारण करणे हे काळाची गरज आहे. मी सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून सर्व काही होईल, असं राजकारण मी करत नाही, असं म्हणत सुजय विखेंनी निलेश लंके यांना टोला लगावला आहे. महायुतीतील सर्वच घटक पक्षांना त्यांचा मानसन्मान मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत, असं सुजय विखेंनी म्हटलं आहे. तर जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून यात्रेला प्रत्येक गावात एक ते दोन तास जायला उशीर होत आहे, एवढा प्रतिसाद जनतेचा मिळतोय, असा दावा निलेश लंके यांनी केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


अहमदनगर लोकसभा : शरद पवार आणि विखे पाटील घराण्याचा संघर्ष, 40 वर्षांची खुन्नस, वादाचा इतिहास काय?