नागपूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीसंध्येला संपन्न झाला असून पुढील दोन दिवसांत जागावाटप देखील होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून माहिती देताना सांगितले. मात्र, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देत, अनेक दिग्गजांना डावलण्यात आलं आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 वरिष्ठ नेत्यांना मंत्रीपदातून वगळले आहे. तर, भाजपनेही शिंदे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या 4 नेत्यांचा पत्ता कट केला आहे. त्यामध्ये, भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि रविंद्र चव्हाण यांचाही समावेश आहे. मात्र, रविंद्र चव्हाण यांना भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मग, सुधीर मुनगंटीवार यांचं काय होणार, सुधीर मुनगंटीवारांना नेमकं कशामुळे मंत्रिपद नाकारण्यात आलं, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) हे भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये दीडतास चर्चा झाली असून त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
भाजपचे नाराज नेते सुधीर मुनगंटीवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेले होते. विशेष म्हणजे या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती आहे, या भेटीवेळी खालून सिक्युरिटी गार्डने कोणालाही घरात सोडले नाही. त्यामुळे, दोन नेत्यांमध्ये नेमकं काय चर्चा झाली, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या मुनगंटीवारांनी गडकरी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
नितीन गडकरी हे माझे मार्गदर्शक आहे, म्हणून आज त्यांची भेट घेतली. मला मंत्रिमंडळात नाव आहे असं सांगण्यात आलं होतं, पण मी आज मंत्री नाही. तरीही, मी नाराज असण्याचं कारण नाही. कारण, काल जे आपल्यापाशी होतं ते उद्या जाणार आहे. उद्या जे आपल्यापाशी नसेल ते परवा येणार आहे, याची मला जाणीव आहे, असे म्हणत मी नाराज नसल्याचं सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटलं. मात्र, किशोर जोगरेवार, गणेश नाईक यांचा संदर्भ देत, ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांनाही मंत्रिपद दिलं जातं, असे म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली.
सुधीर मुनगंटीवार यांना विशेष जबाबदारी
सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. पक्षाने त्यांना विशेष जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे आमच्या पक्षाने काहीतरी विचार करून त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही, असे स्पष्टोक्ती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या चर्चेला पूर्णविराम दिला असल्याचे बोलले जात आहे.
भुजबळांच्या नाराजीवर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया
भुजबळ म्हणत असतील जहाँ पर मन नही लगता, वहाँ पर क्या रहना. तर त्यांची हीदेखील आवडीची ओळ आहे, तेरे बिना दिल नही लगता. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे, त्यामुळे आत्मा शरीर सोडून जात नसतो. भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही याचा अर्थ असा की अजित पवारांनी त्यांच्यासाठी मोठी संधी राखून ठेवली असेल. अजित पवार कुणावर अन्याय करत नाहीत, असे अमोल मिटकरी यांनी म्हटलं.
हेही वाचा
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?