बीड : जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी आंदोलनं करुन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ व आंदोलकांनी केली आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत 3 जणांना अटक केली असून आणखी काही आरोप मोकाट आहेत. मात्र, एका उमेद्या व विकासाची दृष्टी ठेऊन गावासाठी झटणाऱ्या युवा सरपंचाचा अशारितीने खून करण्यात आल्याने बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात, बीडचे नेते आणि मत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यातच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तर, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही याप्रकरणावरुन थेट वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे, वाल्मिक कराड (walmik karad) कोण आहेत, याची चर्चा बीड बाहेरील जिल्ह्यात सुरू झाली आहे. 


केजमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना अटक झाली असून याचे पडसाद आज विधिमंडळातही पाहायला मिळाले. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे प्रकरण विधिमंडळात उचलून धरले, तसेच वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन थेट बोट दाखवले आहे. या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा संशय तेथील गावकऱ्यांनी व्यक्त केल्याचंही दानवे यांनी म्हटलं. त्यावर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 


एका तरुण सरपंचाचा खून करण्यात आला आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. याप्रकरणात पीएसआय सस्पेंड आहे. तर, येथील पीआय सक्तीच्या रजेवर पाठवला आहे. आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे. त्याला अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. ते तपास करत आहेत, आरोप मंत्र्यांचे जवळचे आहेत, असे बोलणं योग्य नाही. कारण संबंध नसताना मंत्र्यावर अंगुली निर्देश होत असतो. AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी विधानपरिषदेत बोलताना सांगितलं आहे. 


कोण आहेत वाल्मीक कराड?


वाल्मीक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मीक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतात. यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता. आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत आहे, तर केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मीक कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहे.


हेही वाचा


शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही