Sudhakar Badgujar : सोमवारी नाशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिकमध्ये असतानाच ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे महानगर विलास शिंदे (Vilas Shinde) यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या आठ दिवसात त्यांच्याकडे कोणी राहणार नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते. आता गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. 

Continues below advertisement


सुधाकर बडगुजर यांनी एबीपी माझाशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तुम्ही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावरून पक्षात काही नाराजी व्यक्त होत आहे का? याबाबत विचारले असता सुधाकर बडगुजर म्हणाले की, मी म्युनिसिपल कामगार सेनेचा अध्यक्ष आहे. 2700 कर्मचारी त्या युनियनचे सभासद आहेत. त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. प्रमुख तीन मागण्या होत्या. पहिली मागणी महापालिकेच्या आस्थापनावर 3609 जागा रिक्त आहेत, त्या त्वरित भराव्यात. दुसरी मागणी क्लास थ्री आणि क्लास फोरचे प्रमोशन रखडले आहे. प्रमोशनचा प्रश्न लवकर सोडवावा. तिसरी मागणी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना लवकर मिळावा, याबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  


विलास शिंदे यांच्यासह दहा-बारा जण नाराज


एकीकडे सकारात्मक चर्चा झाली आणि तुमच्या पक्षात नकारात्मक चर्चा का सुरू आहेत? याबाबत विचारले असता सुधाकर बडगुजर म्हणाले की, नकारात्मक चर्चा कोणी केली हे मला माहित नाही. पण, आमचे काम आम्ही करत राहणार आहोत, असे त्यांनी म्हटले. तुम्ही पक्षात नाराज आहेत का? असे विचारले असता सुधाकर बडगुजर म्हणाले की, मी स्वतःवरच नाराज आहे. संघटनात्मक बद्दल मध्यंतरीच्या काळात झाले, तेव्हापासून महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा नेते नाराज आहेत. वरिष्ठांपर्यंत त्या भावना गेलेल्या आहेत. स्थानिक नेत्यांना याबाबत माहिती आहे. विलास शिंदे यांच्यासह दहा-बारा जण नाराज आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. 


मी स्वतःवरच नाराज : सुधाकर बडगुजर


नाराजीचे कारण काय याबाबत विचारले असता सुधाकर बडगुजर म्हणाले की, संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराजी आहे. आता मी स्पष्ट बोलू शकत नाही. संघटनात्मक बदल झाले तेव्हापासूनच नाराजी पसरली आहे. माझी नाराजी कोणावर नाही, मी स्वतःवरच नाराज आहे. याआधी मी स्वतःहून म्हटलं होतं की, जिल्हाप्रमुख पदावरून मला बाजूला करा. मी काम करू इच्छित नाही. माझ्या जागी कोणाची तरी नियुक्ती करावी, अशी मी मागणी केली होती. त्यानुसार माझी मागणी मान्य देखील झाली. परंतु, संघटनात्मक बदल झाल्यानंतर नाराजीनाट्य चालू झालेले आहे. विलास शिंदे त्यांच्या मुलीचे लग्न होते, त्यावेळेस त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळेस आम्ही त्यांची समजूत देखील काढली. परंतु, पुढील काळात नाराजी निश्चितपणे विलास शिंदे यांच्या कृतीतून आणि भावनेतून दिसेल, असे त्यांनी म्हटले आहे. 



आणखी वाचा 


Sanjay Raut on Girish Mahajan : गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल, संजय राऊतांची जहरी टीका