Bacchu Kadu On Disale Guruji: ग्लोबल टिचर पुरस्कार मिळवणारे बार्शी जी सोलापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजित डिसले गुरुजी यांनी पीएचडी करण्यासाठी अमेरिका जायला रजा मागितली. पण शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले यांना रजा नाकारली. ज्यामुळं रणजितसिंह डिसले गुरुजी व्यथित झाले. इतके की ते शिक्षक म्हणून सरकारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी डिसले गुरुजींना पाठिंबा दर्शवलाय. यातच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही डिसले गुरूजींनी एवढ मनावर घेण्याची गरज नाही, आम्ही त्यांच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
"डिसले गुरुजीनी एवढं मनावर घेण्याची गरज नाही, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी अभ्यासासाठी विदेशात जाण्यासाठीचा अर्ज साध्या कागदावर दिला होता. त्यांचा अर्ज विहित फॉरमॅट मध्ये दिलेला नव्हता. आता त्यांनी अर्ज विहित फॉरमॅट मध्ये दिला आहे. त्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झालाय", असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. दरम्यान, "काही अधिकाऱ्यांनी जाणीपूर्वक मुद्दाम असं केलं आहे का? याचाही शोध आम्ही घेऊ. तसं आढळल्यास योग्य ती कारवाई करू", असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. "काहींनी आम्ही अधिकारी आहोत तो शिक्षक आहे अशा भावनेतून असं केलं आहे का? असं वाटतंय. काही जिल्ह्यांमध्ये निश्चितच कोरोनाचा संक्रमण जास्त आहे, त्यामुळे जिथे संक्रमण जास्त आहे अशा ठिकाणी शाळा सध्या तरी सुरू केल्या नाही पाहिजे... मात्र तो निर्णय स्थानिक प्रशासनाला घ्यायचा आहे शिक्षकांच्या कोरोना चाचणी संदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे", अशी माहिती बच्चू कडू यांनी दिलीय.
चौकशी अहवालामध्ये काय म्हटलं होतं?
ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झालेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिलीय. 2017 साली रणजितसिंह डिसले यांची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी डिसले गुरुजी हे तीन वर्षे गैरहजर होते. असा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांकडून प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली.
हे देखील वाचा-
- सोलापूरच्या शिक्षण विभागाचा आणखी एक कारनामा! डिसले गुरुजींना खरंच ग्लोबल टीचर मिळाला? चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती
- डिसले गुरुजींसाठी रविवारीही शिक्षण विभाग सुरु राहणार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha