Sreejaya Chavan नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची (BJP) साथ दिल्यानंतर तिकडे नांदेडमधील भोकर विधानसभेत (Bhokar Vidhan Sabha) मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण अशोक चव्हाण हे स्वत: राज्यसभेवर (Rajya Sabha Election) जाणार आहेत, त्यानंतर  भोकर विधानसभेतून त्यांची कन्या श्रीजया चव्हाण (Shreejaya Chavan) मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये दाखल होत असताना, त्यांनी काही अटी ठेवल्याची माहिती आहे. त्यापैकी एक अट म्हणजे कन्या श्रीजया चव्हाण (Shreejaya Chavan) यांना विधानसभेचं तिकीट देणं ही होती अशी सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार आता श्रीजया चव्हाण (Shreejaya Chavan) यांना भोकर विधानसभेतून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.


श्रीजया चव्हाण या गेल्या काही दिवसापासून अॅक्टिव्ह राजकारणात दिसत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो  (Bharat Jodo Yatra)  यात्रा नांदेडमध्ये होती तेव्हा श्रीजया चव्हाण हिरीरीने सहभागी होत्या. त्याच्या काही दिवसांनीच श्रीजया चव्हाण भावी आमदार म्हणून बॅनर नांदेडमध्ये झळकले होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस आणि चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारण येणार हे निश्चित झालं. 


कोण आहेत श्रीजया चव्हाण? (Who is Sreejaya Chavan)



  • श्रीजया चव्हाण या अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत

  • अशोक आणि अमित चव्हाण यांच्या द्वितीय कन्या आहेत

  • श्रीजया चव्हाण यांनी LLB शिक्षण घेतलं आहे. 

  • श्रीजया यांचं बालपण आणि शिक्षण मुंबईत गेलं

  • त्या 2019 मध्ये लोकसभेच्या प्रचारात उतरल्या

  • त्यांनी विधानसभेला भोकर मतदारसंघाचा सोशल मीडिया पूर्ण सांभाळला 

  • भारत जोडो यात्रेत त्यांचं लाँचिंग झालं 

  • श्रीजया चव्हाण यांनी आजपर्यंत कोणती निवडणूक लढवली नाही


विधानसभा निवडणुकीत दोन्ही मुलींची महत्त्वाची भूमिका


2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या अनपेक्षित पराभवामुळे त्यांच्या समर्थकांसह चव्हाण परिवाराला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुलींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तीन वर्षांत चव्हाण यांची जनसंपर्क यंत्रणा श्रीजयाने पडद्यामागून लीलया सांभाळली. तसंच अनेक सार्वजनिक कार्यक्रमांच्या नियोजनात भूमिका पार पाडली आहे.


भोकर विधानसभा मतदारसंघ


स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख आहे. 2009 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त मते घेत विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 साली अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण (Amita Chavan) इथून निवडणूकीत उभ्या होत्या. मात्र यावेळेला त्यांचं मताधिक्य वीस हजाराने घटलं होतं. या दरम्यान अशोक चव्हाण नांदेडचे खासदार होते. त्यानंतर 2019 मध्ये अशोक चव्हाण पुन्हा लोकसभेतून विधानसभेच्या मैदानात उतरले. त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भोकर विधानसभा मतदारसंघातून लढवली आणि ते जिंकून आले. अशोक चव्हाण यांना त्यावेळी 1 लाख 40 हजार मतं मिळाली. त्यांच्याविरोधातील भाजप उमेदवार श्रीनिवास गोरठेकर यांना अवघी 43,114 मतं मिळाली होती.


अशोक चव्हाण यांना राज्यसभेचं तिकीट


दरम्यान, दोन दिवसापूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेचं तिकीट मिळालं आहे. अशोक चव्हाण यांनी 12 फेब्रुवारीला काँग्रेसचा सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ते राज्यसभेत जाणार आहेत. त्यामुळे नांदेडमधील विधानसभेत लेकीला उतरवून, विधानसभेत पाठवण्याचा निर्धार चव्हाण कुटुंबीयांचा दिसत आहे. 


संबंधित बातम्या 


भोकर विधानसभा मतदारसंघ | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांपुढे अस्तित्व टिकवण्याचं आव्हान