Sharad Pawar On BJP: आज भारतात चुकीचे विचार पसरवतायत. त्यांनी लगतच्या देशाची परिस्थिती पाहायला हवी. केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये, असं नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. पुण्यात जश्न-ए ईद ए मिलन या राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळाव्यात बोलताना ते असे म्हणाले आहेत.


या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले आहेत की, ''हा देश अनेक जाती-धर्माने बनलाय. यात विविधता आहे, ती उठून दिसायला हवी. या देशात जी फुलं उमलली आहेत, त्या सर्व फुलांचा सन्मान करायला हवा. तेंव्हा आज देशात जी वेगळी स्थिती निर्माण झाली आहे. जगात तर चमत्कारी परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया छोट्याशा युक्रेनवर हल्ला करतोय. हजारोचे प्राण घेतले जात आहेत, मानवतेचे दर्शन संपल्याच दिसतं. आपल्या शेजारच्या श्रीलंकेत सामान्य नागरिक रस्त्यावर उतरला आहे. संघर्ष करतोय अन् राज्यकर्ते अंडरग्राउंड झालेत. त्यांच्यावर तोंड लपवायची वेळ आली आहे. पाकिस्तान जिथं तुमचे आमचे भावबंध आहेत. त्या देशात एक तरुण पंतप्रधान होतो, पण त्याला त्या पदावरून पायउतार व्हावं लागलं. हे का घडतंय? कारण त्या ठिकाणचे राज्यकर्ते आणि त्यांच्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उदभवलेली आहे.'' ते म्हणाले, ''आज देशाच्या अभिमानाला धक्का लावण्याचा प्रयत्न होत असले. पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न होत असेल, तर आपल्याला एकत्र येऊन यांच्या विरोधात उभे रहावे लागेल. यांना धडा शिकवावे लागेल.''


पवार म्हणाले, ''आज आपण इथं कशासाठी जमलो? जात-धर्म बाजूला ठेऊन माणुसकी जपायला जमलो. प्रश्न नक्कीच खूप आहेत. महागाई, विकासाचे प्रश्न उभे आहेत. पण देशात जे चित्र उभं झालंय, त्या अनुषंगाने आपल्याला सध्या भाईचारा जपणे गरजेचे आहेत. मी पक्ष वगैरे मानत नाही. आत्ता ही इथं विविध पक्षाचे नेते आहेत. देशहितासाठी आपण सगळे जमलोय. निवडणुकीचा यात कोणताही विचार नाही. पुण्यातून शांती आणि भाईचाऱ्याचा संदेश जाऊद्यात. सर्वांना कळू द्या, हा आपला आदर्श सर्वांपर्यंत पोहोचू द्या.''