मुंबई: काही अर्बन नक्षलवादी (Naxal) वारीत शिरले आहेत, ही ऐकीव माहिती नसून सबळ पुरावे समोर आले आहेत, असे शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. आता, आमदार कायंदे (Manisha kayande) यांच्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होऊ लागला आहे. मनिषा कायंदे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे.

रोहित पवार यांनी सभागृहाच्या बाहेर बोलताना म्हटलं, काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विधीमंडळात समतेचा विचार आम्ही मांडत आहोत. आमदार म्हणून लोकांसाठी काम करत आहोत. गेल्या काही दिवसापासून राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी राज्यात वेगळ्या पद्धतीच वातावरण व्हावं यासाठी काही आमदार वारकऱ्यांना वारीला बदनाम करत आहेत. शामसुंदर महाराज संविधान समता दिंडी काढतात. संविधान महत्व समजावे यासाठी प्रयत्न करत आहे. यावर सत्तेतील आमदार त्यांच्यावर आरोप करत आहेत. काही आंब्यावर विश्वास असलेले नेते तलवार घेऊन वारीत येतात, त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे आणि संविधान घेऊन वारीत सहभागी होणाऱ्यावर आक्षेप घेतात, त्या महिला आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे होत्या त्यावेळी त्यांच्या बाजूने बोलत होत्या आमदारकीची टर्म संपत आली की त्या शिंदेकडे गेल्या. आता शिंदे यांची ताकद कमी होत आहे हे लक्षात आल्यानंतर भाजपला खुश करण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत, असंही रोहित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या ओढीने पंढरपूरला पायी जात आहेत. मात्र याच वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केला.  आषाढी वारीमध्ये देवाला न मानणाऱ्या नास्तिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झालेला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण हे अर्बन नक्षल संविधान दिंडी, पर्यावरण वारी आणि लोकायत यासारख्या वेगवेगळ्या नावाखाली वारीमध्ये जाऊन पथनाट्य करतात, भाषणं करतात आणि लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकार येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे. हे विधेयक अशा व्यक्तींना अटकाव करण्यासाठी आहे.

यापूर्वी काही जणांकडून वारीवर मटणाचे तुकडे फेकण्याचा प्रकार घडला होता. बंडातात्या कराडकर यांनीही या प्रकारावर सविस्तर भाष्य केले आहे. तसेच या सर्व प्रकारावर त्यांनी (बंडातात्या कराडकर) मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. तसेच दोन दिवसांमध्ये आषाढी एकादशी येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर सरकारने तातडीने गंभीर कारवाई करावी, अशी मागणी मनीषा कायंदे यांनी विधान परिषद सभागृहात केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकार या प्रकरणाची दखल घेत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.