Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: काहीच जण सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतात, अशी टीका नाव न घेता राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी रिक्षावाला, टपरीवाला म्हणत टीका केली होती. यानंतर फेसबुक लाईव्ह करत उद्धव ठाकरे यांनीही बाळासाहेबांनी रिक्षावाला, टपरीवाला, अगदी हातभट्टीवाल्यालाही मोठे केले, असे म्हटले होते. याचाच समाचार घेत नागपूरमध्ये पोहोचलेले देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

  


ज्याला चहावाला म्हणून हिणवलं त्यांच्यावर पाणी पिण्याची वेळ आली, फडणवीस यांची काँग्रेसवर टीका  
  
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''काँग्रेस पक्षाने पंतप्रधान मोदी यांना चहावाला म्हणून हिणवलं. मात्र ज्याला चहावाला म्हणून हिणवलं त्यांच्यावर मोदींनी पाणी पिण्याची वेळ आणली. मोदींनी त्यांना असं पाणी पाजलं की, आज त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे, हे तुम्ही बघत आहे.'' ते म्हणाले, ''जर आम्ही रिक्षावाले असू तर आम्हाला अभिमान आहे. आम्ही पानटपरीवाले असू आम्हाला अभिमान आहे. आम्ही चहा टपरीवाले असू आम्हाला अभिमान आहे. आम्ही रस्त्यावरचे विक्रेते असू आम्हाला अभिमान आहे. सोन्याचा चमचा घेऊन जे लोक जन्माला येतात, त्यांना राज्य करणं हा आमचाच अधिकार आहे, असं वाटतं. त्यांनी हे समजून घ्यावं मोदींच्या काळात सामान्य माणूसच राजा होणार, सामान्य माणूसच राज्य करणार.''   


सामान्य माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो : एकनाथ शिंदे 


तत्पूर्वी सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''आम्ही निर्णय घेतल्यानंतर आमच्यावर टीका झाली. टपरीवाला असं म्हणून हिणवलं. सामान्य माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो.'' ते म्हणाले होते की, ''आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही.''