Maharashtra Mid-Term Election: प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे, असं पुन्हा एकदा शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. माध्यमाशी बोलताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, गेल्या अडीच वर्षात जी काही टीका टिप्पणी झाली त्यावर मी काही बोललो नाही. जे काही चांगलं काम आहे, ते लोकांसमोर आहे. महाराष्ट्र, मुंबई व इतर शहरांसाठी केलेलं काम हे लोकांसमोर असल्याचं ते म्हणाले आहेत.

  


बंडखोर आमदार म्हणत आहे की, आदित्य ठाकरे यांनीही आमच्याकडे लक्ष दिलं नाही, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असताना ते म्हणाले आहेत की, ''मला असं वाटतं त्यांनी (बंडखोर आमदारांनी) हे स्वतःला आरशात पाहून बोलायला हवं.'' आदित्य ठाकरे यांना वगळता 14 शिवसनेच्या आमदारांना शिंदे गटाने व्हीप बजावत नोटीस दिली आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ''आम्ही याविरोधात न्यायालयात जाणार असून या कठीण काळात आम्ही प्रत्येक शिवसैनिक आमदारांसोबत उभे आहोत.'' 


व्हीप उल्लंघन बाबतच्या नोटीसमधून त्यांचं वगळण्यात आलं, यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ''मला कोणाच्याही खास प्रेमाची गरज नाही. आमचाच व्हीप हा अधिकृत व्हीप आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आमचाच व्हीप हा महत्वाचा ठरणार. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक परिस्थितीत आमचे शिवसैनिक आणि आमचे जे आमदार आहे, त्यांच्यासोबतच मी उभा रहाणार आहे.''  


महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणारच : आदित्य ठाकरे 


आदित्य ठाकरे म्हणाले की, ''जे आमदार शिवसेनेतून गेले मी त्यांना बंडखोर म्हणणार नाही, बंड करण्यासाठी हिम्मत लागते. ते आजही राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्यास, आम्हीही तयार आहोत. यात आम्ही सर्व जागा जिंकू. तसेच महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणारच असल्याची शक्यता दिसत आहे आणि ती लागणारच, आम्ही यासाठी पूर्णपणे तयार आहोत.'' तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणारच असं म्हटलं होतं.