Kalyan Lok Sabha constituency : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करताच कल्याण लोकसभा मतदारसंघातील (Kalyan Lok Sabha Election) लढत निश्चित झाली आहे. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि वैशाली दरेकर राणे (Vaishali Darekar Rane) यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर ठाकरेंकडून वैशाली दरेकर यांना तिकिट देण्यात आले आहे. या लढतीकडे मुंबईसह राज्याचं लक्ष लागलेय. त्याला कारणही तसेच आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर श्रीकांत शिंदेविरोधात उद्धव ठाकरे कुणाला तिकिट देणार? याची उत्सुकता तर होतीच. पण श्रीकांत शिंदे यांना स्थानिक भाजप नेत्यांकडूनही जोरदार विरोध होता. कल्याणची जागा श्रीकांत शिंदेंना दिल्यास भाजपचा एकही कार्यकर्ता प्रचारात उतरणार नाही, असा ठरावच भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या (ganpat gaikwad) कार्यालयात मंजूर झाला. पण आता श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. युती धर्म पाळून कट्टर विरोधक श्रीकांत शिंदेंसाठी गणपत गायकवाड काम करणार का? की वेगळी भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस गणपत गायकवाड यांची समजूत काढणार का? हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.


कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात शुक्रवारी रात्री बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपलाच मिळायला हवा, अशी ठाम भूमिका घेतली. कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांना दिल्यास भाजपचे कार्यकर्ते त्यांचे काम करणार नाहीत, असा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाला 24 तास होण्याच्या आतच देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे हेच कल्याणमधून लोकसभेचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. आता गणपत गायकवाड आणि स्थानिक नेते काय भूमिका घेणार? याची चर्चा सुरु आहे. 


देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानं गणपत गायकवाड यांची गोची -


शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध नसल्याचं सांगितलं. श्रीकांत शिंदे हेच कल्यामधून महायुतीचे उमेदवार असतील, असे त्यांनी जाहीर केले. इतकेच नाही तर भाजप श्रीकांत शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या य भूमिकेमुळे गणपत गायकवाड यांची अडचण झाली आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस ताकदीने श्रीकांत शिंदे यांचा प्रचार कऱणार असल्याचं सांगतात, तर दुसरीकडे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यलयात श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठराव मंजूर होतो.. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचं वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस गणपत गायकवाड यांची समजूत काढणार का? की गणपत गायकवाड वेगळी भूमिका घेणार? हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल. 


कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये वाद - 


कल्याण आणि ठाण्याच्या जागेवरून महायुतीत वाद सुरू होता. एक तर ठाण्याची जागा द्या, किंवा कल्याणची जागा द्या असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात आला. पण त्याला कारण, गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद आहे. कल्याण आणि ठाणे परिसरात शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळाला. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वाद तर जगजाहीर आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी (2 फेब्रुवारी) पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहेत. एकनाथ शिंदे यांना मी कोट्यवधी रुपये दिले, असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला होता.
 
गायडवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातील शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद उघड झाल्याचं पहायला मिळले. आता ऐन लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हा वाद चव्हाट्यावर आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी आणि पाठिंबा जाहीर केला खरं, पण स्थानिक भाजप नेते काय भूमिका घेणार? हेही तितकेच महत्वाचं आहे. श्रीकांत शिंदे यांना महायुतीकडून उमदेवारी जाहीर झाल्यानंतर  गणपत गायकवाड आता कोणती भूमिका घेणार? युती धर्म पाळून कट्टर विरोधक श्रीकांत शिंदेंसाठी काम करणार का? की वेगळी भूमिका घेणार? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.