मुंबई : राज्याच्या राजकारणाचा जर बुद्धीबळाच्या दृष्टीने विचार केला तर सध्या कोण कोणाला शह काटशह देतायत असा प्रश्न पडलाय. एकीकडे भाजप आणि शिवसेना या जुन्या मित्रांचे संबंध कमालीचे विकोपाला गेलेत. मात्र आता भाजपचे नव्याने मित्र झालेले एकनाथ शिंदेही (Eknath Shinde0 रोज एकेक प्यादी पुढे सरकवत भाजपला शह देत आहेत का असा प्रश्न पडतोय. कधी रामदास कदम, तर आता थेट संजय शिरसाट (Sanjay Shirsat)  यांनीच भाजपला अडचणीत आणलंय.


बंद दाराआडचं कवित्व पुन्हा सुरू


बंद दाराआडच्या बैठकीचं पुन्हा राजकीय कवित्व सुरू झालं आहे. अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पुन्हा चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचं वक्तव्य हे भाजपची डोकेदुखी वाढवणार असल्याचं दिसतंय. तर काही जाणकारांच्या मते शिंदे गटाचा हा भाजपला शह असल्याचं म्हटलं जातयं. 


सन 2019 ची ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ठाकरे आणि शाहांची झालेली ती बैठक. भाजपची डोकेदुखी वाढवणारी बैठक पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आलीय. त्या बैठकीत आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा शब्द अमित शाहांनी दिला, मात्र भाजपने तो पाळला नाही असा दावा उद्धव ठाकरेंनी वारंवार केलाय. खुद्द अमित शाहांनीही पुण्यातल्या सभेत उद्धव ठाकरेंचा दावा सपशेल फेटाळला होता.


उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते 


निवडणूक निकालांनंतर शिवसेना भाजप युती तुटली आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीची साथ घेत महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र त्यानंतर पुलाखालून आता बरंच पाणी वाहून गेलंय.  उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा त्या बैठकीचा मुद्दा उकरून काढलाय. 'जगदंबेची शपथ, अमित शाहांनी शब्द मोडला', 'तुळजाभवानीची शपथ,
भाजपने दगा दिला' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


रावसाहेब दानवे काय म्हणाले? 


चहापाणीवेळी सहजपणे उद्धव ठाकरे अमित भाईंना म्हणाले, हम जरा अंदर बैठेंगे दो मिनिट. ते आत गेले आणि वीस मिनिटात चर्चा केली. आम्ही ज्या स्टेजवर म्हणालो आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी सगळे शिवसेनेचे नेते त्या स्टेजवर होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी केव्हाही ऑब्जेक्शन घेतलं नाही. जर ठरलेलं होतं तर त्याचवेळी ऑब्जेक्शन घ्यायचं होतं. पण माझ्याशिवाय सरकार बनत नाही असं चित्र यायला लागलं तेव्हा त्यांची भाषा बदलली माझे सगळे चैनल ओपन आहेत.


संजय शिरसाठांच्या दाव्याने भाजपची पंचाईत 


उद्धव ठाकरेंचे दावे सातत्याने फेटाळणाऱ्या भाजपसमोर आता पंचाईत निर्माण झालीय. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अडीच अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता असं मोठं विधान करत खळबळ उडवून दिलीय.


संजय शिरसाट यांच्या वक्तव्याइतकंच टायमिंगलाही महत्त्व आहे. महायुतीचे नेते सगळं सुरळीत असल्याचे कितीही दावे करत असले तरी ते तसं नाही हे लांबलेलं जागावाटप दाखवून देतंय. त्यातच शिंदे गटाचेच ज्येष्ठ नेते रामदास कदम भाजपच्या इराद्यांवर टीका करू लागलेत. आता संजय शिरसाट यांनीही भाजपचे दावे खोडणारी भूमिका घेत नवा शह दिलाय. शिंदे गटातल्या नेत्यांची रोजची वक्तव्य भाजपची कोंडी करत आहेत. 


विशेष म्हणजे आपल्याच नेत्यांच्या वक्तव्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मौन बाळगून आहेत. त्यामुळे अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाचाच हा डाव नाही ना अशा चर्चांना उधाण आलंय.


ही बातमी वाचा: