नवी दिल्ली : राज्यातील महायुतीच्या जागावाटपाची चर्चा (Maharashtra Mahayuti Seat Sharing) अंतिम टप्प्यात आली असून अजित पवार गटाला (Ajit Pawar) एक अंकी जागा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला 11 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या ज्या खासदारांना तिकीट मिळणार नाही त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीची जागावाटपाची चर्चा झाली असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहॆ. अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळी यावर प्राथमिक चर्चा झाली होती.


शिवसेना मुंबईची जागा भाजपला सोडणार


मुंबईत भाजपकडून जास्तीत जास्त जागा लढवण्यात येणार आहेत. त्यासाठी शिंदे गटाने मुंबईतील एक जागा भाजपला सोडण्याची तयारी ठेवल्याची माहिती आहे. त्याचवेळी ठाणे आणि कल्याणची जागा आपल्याकडेच राहावी यासाठी शिंदे गट आग्रही असल्याची माहिती आहे. 


सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्याकडून जागावाटपाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामध्ये कल्याण आणि ठाण्यासाठी ते आग्रही होते. ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केला होता. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या वाट्याची मुंबईतील जागा त्यांनी भाजपला सोडण्याची तयारी दर्शवली. 


अजित पवारांना एक अंकी जागा


त्यानंतर अजित पवारांनी अमित शाह यांच्यासमोर जागावाटपाचा प्रस्ताव सादर केला. सुरुवातीला शिंदे गटाला जितक्या जागा दिल्या जातात तितक्याच आम्हाला मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. पण आता अजित पवारांना एक अंकी जागा मिळणार हे नक्की झालं आहे.


तिकीट कापलेल्या खासदारांचे पुनर्वसन होणार


शिवसेना शिंदे गटाच्या ज्या खासदारांचे तिकीट कापलं जाणार आहे त्या खासदारांचे वेगळ्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं या बैठकीत ठरल्याची माहिती आहे. या खासदारांना विधानपरिषद किंवा विधानसभेवर संधी दिली जाणार आहे.


राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अमित शाहंनी पुढाकार घेतला असून त्यातून मार्गही निघाल्याची माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवणार असून त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे आणि त्या खालोखाल जागा या अजित पवार गटासाठी सोडण्यात येणार आहेत.


कमी जागा मिळालेल्या शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला विधानसभेच्या वेळी जास्त जागा देण्याचं आश्वासन भाजपने दिल्याचं समजतंय. 


ही बातमी वाचा: