मुंबई: मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात रान उठवले आहे. राज ठाकरे हे भाजपच्या दबावासमोर झुकले, असा प्रचार मविआच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे म्हणजे शक्तीहीन झालेला वाघ आहे. असा वाघ लोकांना नकोय, असे वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केले. त्या शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेण्याची गरजच काय होती? राज ठाकरे म्हणतात, इतर पक्ष निवडून आल्यावर त्यांच्या भूमिका बदलू शकतात, मग मी का बदलू नये? पण राज ठाकरे पक्ष स्थापन झाल्यापासून सातत्याने भूमिका बदलत आहेत. 2019 मध्ये त्यांची 'लाव रे तो व्हीडिओ' ही टॅगलाईन लोकप्रिय झाली होती. पण राज ठाकरे यांनी नंतर त्यांची भूमिका बदलली. एवढंच कशाला पक्ष झाल्यापासून राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडाही अनेकदा बदलला. आधी निळा, मग हिरवा, त्यानंतर थोडासा भगवा, असे करत राज ठाकरे यांनी अनेक झेंडे बदलले. त्यामुळे असा दात निघालेला, नखं काढलेला, शक्तीहीन आणि नुसता तोंडाने हवा मारणारा वाघ लोकांना नको आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी सभा घेणार?
राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावर विरोधकांनी सडकून टीका केली होती. राज ठाकरे यांच्या धरसोड भूमिकेवर बोट ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली. राम मंदिराचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नरेंद्र मोदी नसते तर, हा मुद्दा प्रलंबित राहिला असता. आता पुन्हा एकदा त्यांना संधी देणं गरजेचे आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मनसे महायुतीचा प्रचार करणार असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येईल आणि संबंधितांच्या नावांची यादी महायुतीला देण्यात येईल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, महायुतीच्या प्रचारासाठी स्वत: राज ठाकरे उतरणार का, या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप मिळू शकलेले नाही.
आणखी वाचा
राज ठाकरे तुम्हाला कळले का? पत्रकारांचा थेट प्रश्न, शरद पवारांचं चार शब्दात उत्तर, पाहा व्हिडीओ