मुंबई: शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे घराण्याशी इमान कायम राखणारा कट्टर शिवसैनिक आणि पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal) यांचे शनिवारी निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज संध्याकाळी पाच वाजता गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. पांडुरंग सकपाळ यांच्या निधनामुळे ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.


दक्षिण मुंबईतील एक निष्ठावंत शिवसैनिक (Shivsena) म्हणून पांडुरंग सपकाळ यांची ओळख होती. पांडुरंग सकपाळ हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक होते. बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू साथीदार म्हणून ते ओळखले जात होते.  शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरसुद्धा   पांडुरंग सपकाळ हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत राहिले. पक्षाच्या पडत्या काळात दक्षिण मुंबईत भगवा झेंडा फडकवत ठेवण्यात पांडुरंग सकपाळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्याकडे तब्बल 12 वर्षे दक्षिण मुंबईतील प्रभाग क्रमांक १२ च्या विभाग प्रमुखपदाची जबाबदारी होती. मात्र, 2023 साली उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या तेव्हा त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले होते. पांडुरंग सकपाळ यांनी 2019 मध्ये मुंबादेवी मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. याशिवाय, महाविकास आघाडीच्या महामोर्चाची मुख्य जबाबदारी देखील पांडुरंग सकपाळ यांनी सांभाळली होती.







विभागप्रमुखपद गेल्यानंतर राजकारणापासून दूर


उद्धव ठाकरे यांनी 2023 साली दक्षिण मुंबईतील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले होते. यावेळी पांडुरंग सकपाळ यांच्याकडील विभागप्रमुखपद काढून ते संतोष शिंदे यांना देण्यात आले. खासदार अरविंद सावंत यांच्या दबावाच्या राजकारणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. विभागप्रमुखपद गेल्यानंतर पांडुरंग सकपाळ राजकारणापासून अंतर राखून असल्याचे सांगितले जाते. पांडुरंग सकपाळ यांनी मध्यंतरी अजान स्पर्धेचेही आयोजन केले होते. या स्पर्धेवरुन प्रचंड वाद झाला होता. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचे माझ्या मनात आलं. अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार आहे, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर भाजपच्या नेत्यांनी या मुद्द्यावरुन ठाकरे गटाला लक्ष्य केले होते. त्यामुळे पांडुरंग सकपाळ यांनी प्रचंड टीकेचे धनी व्हावे लागले होते.