मुंबई: राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर शिंदे गटात लगेचच धुसफूस सुरु झाली आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या एका वक्तव्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली होती. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे रवींद्र वायकर जिंकले काय किंवा हरले काय, यामध्ये माझा काय दोष?, असे गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिशिर शिंदे यांनी कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. तर भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही कीर्तिकर यांनी आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप केला होता. यानंतर गजानन कीर्तिकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी शिंदे गटाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. अडसूळ यांनी गजानन कीर्तिकर यांची पाठराखण करत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, कीर्तिकर यांच्यावर कारवाई झाली तर मलाही वेगळा विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिला. त्यामुळे शिवसेनेतील ही धुसफूस शिगेला पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 


आनंदराव अडसूळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्या शिशिर शिंदे यांनाही खडेबोल सुनावले. शिशिर शिंदे हा एक छोटा माणूस असून त्याने नीतिमत्ता सोडली आहे. गजानन कीर्तिकर यांचे शिवसेनेतील काम मोठे असून वडिलांनी मुलाच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात काहीही गैर नाही, असे अडसूळ यांनी म्हटले. 


राज्यात महायुतीला फटका बसेल: आनंदराव अडसूळ


लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला काहीप्रमाणात फटका बसेल, असेही भाकीत आनंदराव अडसळू यांनी केले. लोकसभा निवडणुकीचा विचार करता महाराष्ट्रात स्पर्धा आहे, हे पहिल्यांदा मान्य करावे लागेल. मी एखाद्या पक्षाशी बांधील असलो तरी माझं चुकीचं वक्तव्य खरं ठरणार नाही. राज्यात नक्कीच संघर्ष आहे. फार काही जास्त सांगता येणार नाही, पण एक आहे की, मविआने बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे. ही बाब मान्य करावी लागेल. गजानन कीर्तिकर यांच्या दाव्याशी मी सहमत आहे. एकूण राज्यातील आणि देशातील वातावरण पाहिले तर महाविकास आघाडीचं वातावरण आहे, हे आपल्याला स्वीकारावं लागेल. विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केली. ते एकमेकांच्या हातात हात घालून चांगलं काम करत आहेत. विरोधकांच्या या एकजुटीचा  लोकसभा निवडणुकीत महायुतीला नक्कीच फटका बसेल, असे आनंदराव अडसूळ यांनी म्हटले. 


आणखी वाचा


अमोल जिंकला तर वडील म्हणून आनंद; वायकर जिंकला काय अन् हरला काय, माझा काय दोष: गजानन कीर्तिकर