मुंबई: गजानन कीर्तिकर यांनी आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी पूर्वनियोजित कट रचला होता. त्यामुळे कीर्तिकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करणारे भाजप नेते प्रवीण दरेकर यांना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहा (Amit Shah) यांनी आम्हाला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी विनाकारण बोलू नये. अन्यथा महायुतीत ऐक्य नाही, असा संदेश जनतेत जाईल, असे आनंदराव अडसूळ यांनी म्हटले. अडसूळ यांच्या या आक्रमक पावित्र्यानंतर महायुतीमध्ये निर्माण झालेला वाद चिघळण्याची शक्यता आहे. 


गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यानंतर त्यांची शिंदे गटातून हकालपट्टी करण्याच्या हालचाली सुरु आहेत. शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, आनंदराव अडसूळ यांनी कीर्तिकर यांची पाठराखण केली. त्यांनी म्हटले की, आम्ही गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई होऊन देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यांच्यावर  कारवाई करणार नाहीत, हा विश्वास मला आहे. पण त्यांच्यावर कारवाई झाली तर मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही आनंदराव अडसूळ यांनी दिला.


अडसूळांनी शिशिर शिंदे यांना झापलं, म्हणाले....


शिशिर शिंदे यांनी सर्वप्रथम गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत त्यांची पक्षातून हकालपट्टीची मागणी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आनंदराव अडसूळ यांनी शिशिर शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. शिशिर शिंदे हा एक छोटा माणूस असून त्याने नीतिमत्ता सोडली आहे. आपण कोणाविषयी बोलतोय याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. ज्याने अनेक वर्ष काम केले, अशा माणसावर आरोप करताना आपण कोण आहोत? आपण किती छोटे आहोत? किंवा ती माणसं किती मोठी आहेत एवढा तरी विचार केला पाहिजे. गजानन कीर्तिकर यांचे शिवसेनेतील काम मोठे असून वडिलांनी मुलाच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात काहीही गैर नाही, असे आनंदराव अडसूळ यांनी म्हटले.


प्रवीण दरेकरांची आनंदराव अडसूळांवर टीका


आनंदराव अडसूळ यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फटका बसेल, असे वक्तव्य केले होते. यावरुन भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार आक्रमक झाले होते. महायुतीत राहून आपल्या विरोधात बोलणे योग्य नाही. शिवसेना पक्ष भाजपासोबत आहे. उमेदवारीवेळी आपण नवनीत राणांना समर्थन दिले. आता निवडणुका झाल्यावर अशा प्रकारचे बोलणे  आपल्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. हे विकृत प्रकारचे वक्तव्य आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते.


आणखी वाचा


लोकसभा निवडणुकीत मविआने आघाडी घेतलीये, महायुतीला फटका बसेल, शिंदे गटाच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ