नागपूर: मला छगन भुजबळ यांची कीव येते. त्यांनी कितीही आगपाखड केली किंवा कितीही ढोंगीपणा केला तरी त्यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याची हिंमत नाही. छगन भुजबळ यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना आव्हान दिले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या नेत्यांना जाहीरपणे खडेबोल सुनावले आहेत. मात्र, सुहास कांदे यांनी बुधवारी पहिल्यांदाच छगन भुजबळ यांना त्यांच्याप्रमाणेच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले.


मी एकदा छगन भुजबळ साहेबांना बोललो होतो की, साहेब तुम्ही दिसायला सुंदर असता तर तुम्ही चांगले अभिनेते झाले असते. पण दुर्दैवाने ते दिसायला चांगले नाहीत म्हणून ते अॅक्टर झाले नाहीत. फक्त छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं म्हणजे ते ओबीसी समाजाला दिलं, असं होतं का? छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज का? एका बाजूला भुजबळांनी मुलाला दिलं, दुसऱ्या बाजूला पुतण्याला दिलं. छगन भुजबळांच्या या मक्तेदारीविरोधात तक्रार करणारा पहिला व्यक्ती म्हणजे सुहास कांदे आहे. छगन भुजबळ यांनी दिंडोरी आणि नाशिक लोकसभेत काम केलं नाही, याचे पुरावे आम्ही वरिष्ठांना दिले. त्यामुळेच भुजबळांना मंत्रिपद मिळाले नाही, हे मी आवर्जून सांगेन, असे सुहास कांदे यांनी म्हटले.


सुहास कांदेंचं छगन भुजबळांना ओपन चॅलेंज


सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांना, 'तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन दाखवाच', असे ओपन चॅलेंज दिले.  भुजबळांनी कितीही आगपाखड करावी, ढोंग करावं, पण ते राजीनामा देणार नाहीत. ते खरचं ओरिजनल भुजबळ असतील तर त्यांनी पक्षाचा आणि पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला पुन्हा उभे राहावे, अशा शब्दांत सुहास कांदे यांनी छगन भुजबळांना ललकारले.


मी जातपात मानत नाही, पण छगन भुजबळ यांच्या येवल्यातील मेळाव्यात विशिष्ट जातीचे लोकच दिसतील, 100 पैकी 99 जण एकाच जातीचे आहेत. या एकाच समाजाचे लोक छगन भुजबळ यांना डोक्यावर उचलतात. छगन भुजबळ यांना महायुतीसोबत केलेल्या गद्दारीचे फळ मिळाले आहे. भुजबळ समर्थकांनी अजितदादांच्या प्रतिमेला जोडे मारले, त्यांच्याविरोधात नको-नको ते बोलले. अजित पवार हे छगन भुजबळांना भेटायला नाशिकमध्ये येणार, या बातम्या भुजबळांच्या जवळ असणाऱ्या नाशिकमधील पत्रकारांनी पेरल्या आहेत. अजितदादांनी छगन भुजबळ यांना फोन केलेला नाही. ते भुजबळांना फोन करणार नाहीत. पण छगन भुजबळ यांच्यात पक्ष सोडण्याची हिंमत नाही, असे सुहास कांदे यांनी म्हटले. 



आणखी वाचा


मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळांचे शा‍ब्दिक हल्ले; अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!