Chhagan Bhujbal: राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच नागपुरात सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन सोडून छगन भुजबळ नाशिकला गेले. तसेच पुढील अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचं देखील छगन भुजबळ यांनी जाहीर केले. 


छगन भुजबळांच्या या नाराजीनंतर आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. भेटीची तारीख अद्याप ठरली नाही. मात्र तिन्ही नेते नाशिक मधे जाऊन भेट घेण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यात अजित पवारांना यश येणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Ajit Pawar Praful Patel will meet Chhagan Bhujbal)


छगन भुजबळ हे सध्या राज्यातील प्रमुख ओबीसी नेते-


छगन भुजबळ हे सध्या राज्यातील प्रमुख ओबीसी नेते आणि समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत आहेत. ते लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. छगन भुजबळ हे आजघडीला राज्यातील प्रमुख ओबीसी नेता आहेत. त्यांच्यासारखा मोठा चेहरा गमावणे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला परवडण्यासारखे नाही. विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले असले तरी छगन भुजबळांच्या जाण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसू शकतो. तसेच छगन भुजबळ यांच्यासारखा अनुभवी लोकनेता भाजप किंवा अन्य पक्षाच्या गळाला लागणे, हे अजित पवार यांच्या पक्षासाठी फारसे भूषणावह नसेल. त्यामुळे आता अजित पवार हे नाशिकला जाऊन छगन भुजबळ यांची समजूत काढतील, असे सांगितले जात आहे.


छगन भुजबळांनी अजित पवारांनी जबाबदार धरल्याची चर्चा-


माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. त्यामुळे मंत्रिपदी मला कोणी डावलले याची मी माहिती घेत आहे. असे विधान छगन भुजबळ यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केले. आपल्यासारख्या बहुजन नेत्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नव्हता, असे छगन भुजबळ यांनी सूचित केले आणि एकप्रकारे गच्छेतीसाठी अजित पवार यांना जबाबदार धरल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ यांना मंत्री करावे, असे पक्षातील अन्य काही नेत्यांचे म्हणणे होते, अशीही माहिती समोर आली. 




संबंधित बातमी:


Maharashtra Cabinet Expansion: महायुतीचं ठरलं! गृह, महसूल, पर्यटन ते महसूल, नगरविकास...; कोणाला कोणती खाती मिळणार, संभाव्य यादी समोर