नागपूर: अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंत्रिमंडळात संधी न दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आता राजकारणातील आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. छगन भुजबळ गेल्या दोन दिवसांपासून जाहीरपणे राष्ट्रवादीतील अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या त्रिकुटावर तोफ डागत आहेत. हे तिन्ही नेतेच सर्व निर्णय घेतात. मला मंत्रिपद सोडा पण साधे निर्णयप्रक्रियेतही सामील करुन घेतले जात नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. मी उठ तेव्हा उठ, बस तेव्हा बस, असे करायला मी त्यांच्या हातातील खेळणे आहे का, असा संतप्त सवालही भुजबळ यांनी विचारला होता. मात्र, त्याचवेळी छगन भुजबळ यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ममत्त्वभाव व्यक्त केला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी मी मंत्रिमंडळात असावे, यासाठी आग्रह धरला होता, असे भुजबळांनी सांगितले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या नेत्याने मला मंत्रिमंडळात घेण्यास नकार दिला, याचा शोध घेतला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले होते. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे ते भाजप आणि देवेंद्र फडणवीसांच्या अधिक जवळ गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते आगामी काळात भाजपच्या गोटात दाखल होऊन महाराष्ट्र किंवा दिल्लीत कुठेही काम करु शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. छगन भुजबळ हे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेणार आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये त्यांनी अजित पवारांवर केलेली थेट टीका पाहता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहतील, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत छगन भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय स्वीकारु शकतात.
राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले असताना छगन भुजबळ यांनी एकट्याने मनोज जरांगे यांना अंगावर घेत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडला होता. यामुळे अजित पवार यांची कोंडी झाली होती. मात्र, ओबीसी ध्रुवीकरणामुळे भाजपला फायदा झाला होता. भुजबळ यांच्या पुढाकारानंतर राज्यभरात मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर देणारी फळी उभी राहिली होती. त्यामुळे आगामी काळात छगन भुजबळ हे भाजपसाठी ओबीसी नेते म्हणून फायदेशीर ठरु शकतात.
छगन भुजबळांनी मंडल आयोगाला विरोध करणाऱ्या भाजपमध्ये जाऊ नये: सचिन खरात
ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्री पद मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असलेल्या बातम्या माध्यमातून दिसत आहेत. परंतु याबाबत पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती की मी स्वतः मंत्रिमंडळात असावं असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. परंतु भुजबळ साहेब, संविधान निर्माता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपला मागील इतिहास विसरतो तो समाज पुढील इतिहास निर्माण करू शकत नाही. त्यामुळे याच भाजपाच्या नेत्यांनीच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला म्हणजे मंडल आयोगाला विरोध केला होता. नुसता विरोध नाही तर विरोध करून भारतामध्ये कमंडल यात्रा काढली होती. त्यामुळे भुजबळ साहेब आपण कुठेही जा, परंतु भारतीय जनता पार्टीत जाऊ नका, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपणास करत असल्याचे सचिन खरात यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा