मुंबई: राज्य विधिमंडळाच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरला. सत्ताधारी गटातील शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात शुक्रवारी सकाळी विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्कीचा प्रकार घडला. असा कोणताही प्रकार घडल्याचे सत्ताधारी पक्षाकडून नाकारण्यात आले. मात्र, राजकीय वर्तुळात आज दिवसभर याच प्रकाराची चर्चा रंगली होती. महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) आणि दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यातील या वादामुळे सत्ताधारी आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचा संदेश गेला आहे. शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि शंभूराज देसाई वेळीच मध्ये पडल्याने हा वाद जास्त चिघळला नाही. परंतु, तोपर्यंत राज्य सरकारची जी शोभा व्हायची ती होऊन गेली. या वादानंतर महेंद्र थोरवे यांनी दिलेली प्रतिक्रियाही बरेच काही सांगून जाणारी होती.


महेंद्र थोरवे काय म्हणाले?


मंत्री असणारे दादा भुसे यांच्याकडे मी कामानिमित्ताने गेलो होतो. दोन महिन्यांपासून पाठपुरावा करतोय. आमदार भरत गोगावले असतील मी स्वतः असेल, आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहोत. माझ्या मतदारसंघातील कामाबाबत  मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितलेलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितले की काम करून घ्या. परंतु दादा भुसेंनी सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक काम केले नाही. आज मी त्यांना त्याबाबत विचारलं की, दादा बाकीच्या लोकांची कामं झाली, त्यासाठी काल तुम्ही मीटिंग घेतली, पण मी सांगितलेलं कामं, मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही मीटिंगमध्ये घेतली नाही.


मी त्यांना विचारायला गेलो, तर दादा भुसे माझ्यावरती थोडीसे चिडून बोलले. मी विचार केला आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदार दिली आहे मंत्री म्हणून, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत. अशापद्धतीने अॅरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही आहोत. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी काही तुमच्या घरी खायला येत नाही.  तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचे काम आहे. मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे. माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या, असं सांगितलं. 


परंतु त्यांची बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीचा होता. म्हणून आमच्यात थोडीची शाब्दिक चकमक झाली. दादा भुसे माझ्याशी जोरात, मोठ्या आवाजात बोलले. म्हणून मी त्यांना बोललो की तुम्ही अशा पद्धतीने आमच्याशी बोलू नका, आम्हीही आमदार आहोत आणि तुम्हाला मंत्री आम्ही केले. आमदारांमुळेच तुम्ही मंत्री होत असतात. त्यामुळे तुम्ही आमदारांचा रिस्पेक्ट ठेवायला हवा. 


आम्ही तीन लाख साडेतीन लाख लोकांचा प्रतिनिधी त्या ठिकाणी करत असताना, आम्हीसुद्धा या ठिकाणी येऊन सभागृहात येऊन जी काय कामे असतात ती कामे मंत्र्यांकडून घेण्याचा पाठपुरावा करत असतो. मुख्यमंत्री साहेबांचे आमचे प्रत्येक काम करण्यासाठी,फोन करा हे करा ते करत असतात. पण मंत्री अशा पद्धतीने वागतात त्या गोष्टीचा फार दुःख होतं. म्हणून ते मी एक आमदार म्हणून थोडा तिथेच रिअॅक्ट झालो. 


कोणत्या कामावरुन राडा?


माझ्या मतदारसंघातील एमएसआरडीसीचं काम आहे. त्यांना सांगितलं होतं. त्या कामाबाबत बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा होणार होती. पण त्यांनी जाणीवपूर्वक बोर्ड मीटिंगमध्ये ते काम घेतलं नाही. वेगळी दोन कामे मात्र त्यांनी त्या ठिकाणी घेतली गेली. मग हे काम आमदारांनी सांगून सुद्धा त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही. याबाबत मी त्यांना जाब विचारला, असं महेंद्र थोरवे म्हणाले.


दादा भुसे निगेटिव्ह, अॅरोगंट


दादा भुसे निगेटिव्ह, अॅरोगंट आहेत. त्यांच्याबाबत सुहास कांदे किंवा अन्य कोणीही आमदार सांगतील. दादा भुसे आमदारांशी नीट वागत नाहीत, विश्वासात घेत नाहीत. मुख्यमंत्री प्रेमाने आमदारांची कामं करतात, मंत्र्यांकडूनही तिच अपेक्षा असते, पण दादा भुसे तसे वागत नाहीत. मंत्री आम्हाला सरपंच समजतात, पण आम्ही सरपंच नाही, आम्ही तीन-साडेतीन लाख लोकांचं प्रतिनिधीत्व करतो. लोकांची कामं झाली पाहिजेत हीच आमची मागणी आहे. 


दादा भुसेंची तक्रार करणार का?


आमचे अन्य मंत्री चांगली कामं करत आहेत, पण दादा भुसे एकमेव असे आहेत जे चुकीचे पद्धतीने वागतात. मुख्यमंत्री स्वत:१६-१८ तास काम करतात. त्यांचा आदर्श त्यांनी घ्यावा. मी पहिल्यांदा निवडून आलो आहे, दादा भुसेंपेक्षा वयाने कमी आहे. पण जी कामं लोकांची आहेत ती झाली पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे, मोठ्या लोकांनी आमदारांनी त्याला प्राधान्य द्यावं ही अपेक्षा आहे. आमदारांची गरजच नाही असं जर ते वागत असतील, तर ते योग्य नाही. 


आम्ही दोघेही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे विचार आहे. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलंय, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, त्यामुळे आमच्यातील शिवसैनिक जागा झाला, दादा भुसेंनी लोकांची कामं करावीत ही अपेक्षा आहे, असं महेंद्र थोरवे म्हणाले.


आणखी वाचा


महेंद्र थोरवे माझे मित्र, असं काही घडलंच नाही; थोरवेंसोबतच्या राड्यावर दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया