मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची आज मातोश्रीवर बैठक संपन्न झाली. शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली असून रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या अनुंषगाने तयारी सुरू केलीय. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदारांना मार्गदर्शन केले. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यमान आमदारांमधील बहुतांश आमदारांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. यादी जाहीर होण्याची वाट बघू नका, तुमच्याबाबतीत ती सर्व औपचारिकता आहे, असे म्हणत आजच्या बैठकीमध्ये विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, 22 ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचनाही या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे, आजच्या बैठकीकडे राज्यातील शिवसेना (Shivsena) व ठाकरे गटाचे नेते लक्ष लागले होते. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून 20 नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार असून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे, महायुती व महाविकास आघाडीकडून लवकरात लवकर उमेदवारांची यादी जाहीर करुन उमेदवारांना प्रचारासाठी मैदानात उतरवले जाणार आहे. त्यामुळे आजच विद्यमान आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी  पक्षप्रमुखांकडून एबी फॉर्म दिले गेल्याची सुत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 15 विद्यमान आमदार या बैठकीला उपस्थित होते. त्यातील बहुतांश आमदारांचे विधानसभा निवडणुकीचे तिकीट निश्चित मानले जात आहे. ज्या आमदारांना मुहूर्तावर एखादा दिवस ठरवून एबी फॉर्म घेऊन जायचं आहे,  ते आमदार त्यादिवशी  एबी फॉर्म घेऊन जातील, असेही समजते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने  महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार आहे. लोकसभा निवडणुकांवेळी ज्या काही त्रुटी महाविकास आघाडीतील पक्षांना जाणवल्या, त्या दृष्टिकोनातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तक्रारींचे निवारण राज्य निवडणूक आयोगाने करावे, यासाठी ही भेट असल्याचे देखील या बैठकीतील उपस्थित आमदारांकडून समजते. 

शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान  15 आमदार

१) आदित्य ठाकरे२) अजय चौधरी ३) राजन साळवी४) वैभव नाईक५) नितीन देशमुख६) सुनिल राऊत७) सुनिल प्रभू८) भास्कर जाधव९) रमेश कोरगावंकर१०) प्रकाश फातर्फेकर ११) कैलास पाटिल१२) संजय पोतनीस१३) उदयसिंह राजपूत१४) राहुल पाटिल१५) ऋतुजा लटके

हेही वाचा

NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत भरत गोगावलेंनी एका वाक्यातच विषय संपवला