Vijay Wadettiwar on BJP : भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) कायम अवास्तव बोलतात. भाजपच्या (BJP) नेत्यांनी जो अजेंडा त्यांना दिला आहे, त्यानुसार त्याचे बोलणे सुरू आहे. भाजप निवडणूक हरत आहे, निवडणूक जिंकू शकत नाही, म्हणून मतांचे पोलरायझेशन करण्यासाठी, धार्मिक आणि जातीय तेड निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न सुरू आहे. किंबहुना मृताच्या टाळूवरील लोणी खाता येईल, अशीच भाजपची नीती आहे, तेच नितेश राणे यांच्या मुखातून बाहेर येत आहे. अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) केली आहे. 


ज्या नितेश राणेंनी आरएसएसवर काँग्रेसमध्ये असताना टीका केली. हे हाफ चड्डीवाले आरक्षण देऊ शकत नाही, हे जातीवादी आहे, असे ते म्हणाले होते. मात्र आता सत्तेच्या खुर्चीवर ते असे वक्तव्य करत असेल आणि दोन धर्मात आग लावण्याचे काम करत असेल तर सरकारने त्याचा बंदोबस्त करावा. शासनाची भूमिका त्यासंदर्भात स्पष्ट होत नाही, याचा अर्थ असा भारतीय जनता पक्षाला या राज्यात दंगली घडवायच्या आहे. हे राज्य अस्थिर करायचे आहे. भांडण लावायची आहेत. निष्पाप लोकांचा जीव घ्यायचा आहे. ही भाजपची सत्तेसाठी आलेली नीती आहे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.


एकनाथ शिंदे समाजाची बनवाबनवी करताय - विजय वडेट्टीवार


लक्ष्मण हाके यांनी त्यांची भूमिका काय आहे, ते त्यांनी मांडली असावी. त्यांचे मत वेगळे असू शकते. मात्र, शरद पवारांची भूमिका आम्हाला तशी वाटत नाही. मुख्यमंत्री समाजाला बनविण्याचे काम करत आहे. जरांगे पाटलांचा मोर्चा होता तो मुंबईला अडविण्यात आला. तेव्हा त्यांना काय लिहून देण्यात आले, त्यांनी नंतर माघार घेतली. त्यांच्या काय मागण्या मान्य केल्या, अशी बनवाबनवी एकनाथ शिंदे समाजाची करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमचे आव्हान आहे, की  त्यांनी जे काही लिहून दिलं त्याची पूर्तता करावी. पवार साहेबांच्या संदर्भात मात्र ते विधान मला योग्य वाटत नसल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.


पराभव पुढे दिसत असल्याने हा रडीचा डाव


महाराष्ट्रात निवडणूक वेळेवर व्हाव्यात,  ही सगळ्यांची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये जर भाजपला निवडणुका नको असेल तर दंगली घडवतील आणि राज्यपालांच्या मार्फत अहवाल देतील, महाराष्ट्र अस्थिर आहे, म्हणून निवडणुकापुढे ढकला असेही ते करू शकतात. पराभव पुढे दिसत असल्याने हा रडीचा डाव खेळला जातो आहे. लाडकी बहीण योजना आणून सुद्धा पराभव त्यांना दिसतो आहे. त्यामुळे ते कुठले ही डाव खेळू शकतात. जेवढा निवडणुका लांबणीवर टाकाल तेवढा महाविकास आघाडी भक्कम होईल. आमची संख्या अधिकाधिक वाढेल. असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी बोलतांना व्यक्त केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या