Shirur Lok Sabha Constituency: शिरूर : काही दिवसांतच लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जाहीर होणार आहेत. अवघ्या देशाचं लक्ष लोकसभा निवडणुकांच्या तारखांकडे लागलं आहे. अशातच महाराष्ट्रातही (Maharashtra Politics) सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातल्या त्यात आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघ (Shirur Lok Sabha Constituency) चर्चेत आला आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात पडलेली अंतर्गत फूट आणि काँग्रेसला पडलेलं खिंडार यामुळे राज्यातील राजकारणानं वेगळं वळणं घेतलं आहे. अशातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार (Sharad Pawar) गटातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना खुद्द अजित पवारांनी दिलेल्या आव्हानामुळे शिरूरची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. 


शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार आढळराव पाटील (Shivaji Adhalrao) यंदा उत्सुक असल्याची चर्चा आहे. अशातच शिवसेनेतील अंतर्गत फुटीनंतर शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंची कास धरली. तेव्हापासूनच आगामी लोकसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी आढळरावांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चाही मतदारसंघात सुरू आहेत. अशातच या चर्चांनी आता आणखी जोर धरला आहे, तो आढळराव आणि त्यांचे कट्टर विरोधक आमदार दिलीप मोहिते यांच्यातील भेटीमुळे 






आढळराव आणि मोहितेंची भेट 


शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळरावांनी त्यांचे कट्टर विरोधक आमदार दिलीप मोहितेंची भेट घेतली. आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर लोकसभा लढणार असं निश्चित मानलं जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अशातच आढळरावांना तिकीट देण्याबाबत अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंनी विरोध दर्शवला होता. दिलीप मोहितेंच्या विरोधामुळे आढळरावांची लोकसभेची वाट खडतर होणार असल्याचंही सांगितलं जात होतं. अशातच माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी काल (शनिवारी) मोहितेंच्या घरी जाऊन भेट घेतली आणि वैर संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या भेटीनंतर आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, यावर शिक्कामोर्तब होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


आढळराव आणि मोहितेंमधील कट्टर वैर सर्वश्रूत 


काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मंचरमध्ये शेतकरी मेळावा पार पडला. पण, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गैरहजरीमुळे नाराजीनाट्याची चर्चा रंगली. महाविकास आघाडीचं सरकार असताना सर्वाधिक बिघाडी शिरूर लोकसभेत पाहायला मिळाली होती. शिवाजी आढळराव आणि दिलीप मोहितेंमधील संघर्ष तेंव्हा राज्यानं पाहिला. अशा परिस्थितीत अजित पवार शिरूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आढळरावांचा पक्षप्रवेश घेणार आहेत. अमोल कोल्हेचा पराभव करण्यासाठी अजित पवार हे पाऊल टाकणार आहे. पण मोहितेंना काय हे पचनी पडलेलं नाही,अशी चर्चा सर्वत्र रंगलेली. म्हणून अजित पवारांच्या उपस्थित मोहितेंच्या मतदारसंघालगत शेतकरी मेळावा पार पडला आणि मोहितेंनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. 


मी नाराज नाही, कुटुंबातील लग्नासाठी गेलेलो : आमदार दिलीप मोहिते 


दिलीप मोहिते म्हणतात, कुटुंबातील लग्न असल्यानं मी आजच्या सभेला आलो नाही. मी नाराज नाही. शिवाजी आढळराव आमच्या महायुतीत आहेत, त्यामुळं त्यांनी अजित दादांच्या गाडीतून प्रवास केला असेल, असं फोनवरून माहिती देत, अधिकचं बोलणं मात्र टाळलं.