Nitesh Rane on Tapovan tree cutting: नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला मोठ्या प्रमाणावर वेग आला असून, साधू-महंतांच्या निवासासाठी तपोवन (Tapovan) परिसरातील 1150 एकरांवर साधूग्राम (Sadhugram) उभारण्याची योजना आहे. या कामासाठी 1800 झाडांची तोड (Nashik Tree Cutting) प्रस्तावित असल्याने स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींच्या तीव्र नाराजीचा उद्रेक झाला आहे. दरम्यान, तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी वादग्रस्त विधान केल्याने विषय आणखी चिघळला आहे. तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
Shiv Sena UBT on Nitesh Rane: टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोड बसणार तरी कुठे?
शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय आहे, धर्माचा नाही. टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला वृक्षतोडसारखा गंभीर विषय कुठून समजणार? टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोड बसणार तरी कुठे? त्याच्या सिस्टीममध्ये तर हिंदू-मुस्लीम, बकरा-कोंबडीच फिरतात, वृक्षतोडची फाईल तर ‘अनसपोर्टेड फॉर्मेट’ म्हणूनच उघडत नाही, असे म्हणत त्यांनी नितेश राणेंवर टीका केलीय.
Nitesh Rane on Nashik Tree Cutting: पर्यावरणवादी बकरी ईदला गप्प का?
नितेश राणे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले होते की, तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव? असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला असतानाच नितेश राणे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Nitesh Rane on Nashik Tree Cutting: बकरीला का मिठी मारत नाही?
दरम्यान, नितेश राणेंच्या ट्विटवरून टीकेची झोड उठताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलंय. नितेश राणे म्हणाले की, ईदमध्ये मोठ्या प्रमाणात बकरींची हत्या होते आणि रक्ताचे पाट वाहत असतात, तेव्हा हे पर्यावरणवादी आवाज उठवताना दिसत नाहीत. व्हर्च्युअल बकरी ईद करा, असं कधीच बोलताना दिसत नाहीत. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा कशाला, असा प्रश्न मी विचारला आहे. झाडं जगली पाहिजेत, हा पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य मुद्दा आहे. पण जसं झाडाला मिठी मारतात, तसं बकरीला का मिठी मारत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा