Uddhav Thackeray In Hingoli: आगामी  लोकसभेच्या निवडणुकांचे (Lok Sabha Election) बिगुल अखेर फुंकल्या गेले आहे. त्यामुळे जवळ जवळ सर्वच पक्षानी आप-आपल्या पक्षाचा प्रचार-प्रसार आणि सभांचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे देखील कामाला लागले असून, उद्या 18 आणि 19 मार्चला उद्धव ठाकरे दोन दिवसीय हिंगोली (Hingoli) जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात ते पाच ठिकाणी संवाद मेळावे घेणार असून यावेळी उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यात तोफ धडाडणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून नेमके काय भाष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


पाच संवाद मेळाव्यातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार 


मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी स्वत: मैदानात उतरून सभांचा धडाका लावला आहे. कोकण, छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील यवतमाळ-वाशिम नंतर आता उद्धव ठाकरे यांनी आपला मोर्चा मराठवाड्यातील हिंगोली (Hingoli) जिल्ह्याकडे वळवला आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांचा दौरा हिंगोलीत 23 आणि 24 फेब्रुवारीला होणार होता. मात्र काही कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याने उद्या 18 आणि 19 मार्चला उद्धव ठाकरे दोन दिवसीय हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.


मविआमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे याच जनसंवाद मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचा उमेदवाराची घोषणा करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. उद्या सकाळी साडेदहाच्या दरम्यान नांदेड येथे उद्धव ठाकरेंचे आगमन होणार असून त्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याला ते सुरुवात करतील. 


हिंगोली मतदारसंघ ठाकरे गटाला मिळणार?


मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावर चर्चा सुरु आहे. ज्यात मराठवाड्यातील आठही जगांवर देखील चर्चा झाली आहे. ज्यात फक्त हिंगोली लोकसभा मतदारसंघाबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. कारण सर्वच पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. अशात उद्धव ठाकरे हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन दिवस दौरा करून पाच  सभा घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे अप्रत्यक्षरीत्या हिंगोली लोकसभेच्या जागेवर दावा करतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडून हिंगोलीवर दावा करणाऱ्या अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता काँग्रेस देखील ही जागा ठाकरे गटाला सोडू शकते.


इतर महत्वाच्या बातम्या